बीड : बीड जिल्ह्यात आतापर्यंत ६० कोरोना संशयितांचे स्वॅब तपासणीला पाठविले होते. त्या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. अद्यापही नशिब बीडकरांच्या पाठिशी असल्याचे दिसून येत आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळू नये, यासाठी लोक प्रार्थना करू लागले आहेत.
बीड व अंबाजोगाई येथे आयसोलेशन वॉर्ड तयार करण्यात आलेले आहेत. शुक्रवारी ५५ अहवाल निगेटिव्ह आले होते. त्यानंतर आणखी ५ लोकांचा स्वॅब प्रयोगशाळेत पाठविले होते. त्यांचा निकाल शनिवारी दुपारी आला असून सर्वच निगेटिव्ह आहेत. आतापर्यंत पाठविलेले सर्व ६० अहवाल निगेटिव्ह आल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. त्यामुळे बीडकरांमध्ये समाधान आहे. परंतु शेजारील जिल्ह्यांमध्ये कोरोनाग्रस्त रुग्ण आढळल्याने काही प्रमाणात धाकधूकही असल्याचे दिसते.