माजलगांव : शहरातील आडत दुकानदाराचा ११ लाख रुपये किमतीचा ४५८ किंव्ट्टल गहू विक्रीसाठी दोन ट्रक मधून पाठवला असता चालकांनीच तो लंपास केल्याचे उघडकीस आले होते. या प्रकरणी जिल्हा गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अवघ्या पाच दिवसांत तपास करत गंभीरवाडी ता. कळंब येथील एका शेतातून आरोपींसह ४५८ किंव्ट्टल गहू ताब्यात घेतला.
येथील मोंढ्यात सुनील कंसराव राऊत यांचे आडत दुकान आहे. १९ फेब्रुवारीच्या सांयकाळी ५ वाजेच्या दरम्यान दोन ट्रक मधून ( क्रं.-एम.एच.-२०/डीई-०९७० व क्रं.-एम.एच.-१२/जेएफ-७७३४ ) ११ लाख रुपयाचा तब्बल ४५८ क्विंटल गहू हैद्राबाद येथील तिरुपती रोलर फ्लोअर मील येथे रवाना करण्यात आला. मात्र ट्रान्सपोर्टचे कुंडलीक तुकाराम भराटे ( रा.गंभीरवाडी, ता.कळंब ) आणि गोपाळ गुडागे ( रा.कळंब ) यांनी संगनमत करून दोन्ही ट्रक मध्येच लंपास केले. फसवणूक झाल्याचे लक्षात येतच सुनील राऊत यांनी दि.२३ फेब्रुवारीला गुन्हा दाखल केला.
याप्रकरणी जिल्हा गुन्हे अन्वेषण पथकाचे प्रमुख भारतकुमार राऊत यांचे मार्गदर्शनाखाली निरीक्षक संतोष जोंधळे, तुळशीराम जगताप,मुंजाबा कुहारे, भास्कर केंद्रे,विकास वाघमारे, बालाजी दराडे यांनी गुरुवारी कळंब तालुक्यातील गंभीरवाडी येथे एका शेतात छापा टाकला. यावेळी पोलिसांनी तेथून ४५८ किंव्ट्टल गहू व आरोपी गोकुळ हरिदास गोडगे व कुंडलीक तुकाराम भराटे यांना ताब्यात घेतले.