माजलगाव (बीड ) : मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन तीव्र सुरु आहेत. मात्र, राज्य सरकारचा याबाबत अद्याप निर्णय नाही. यामुळे सरकारच्या निषेधार्त व मराठा आरक्षणाला पाठींबा देत माजलगाव पंचायत समितीचे उपसभापती सुशील सोळंके यांनी आज राजीनामा दिला.
मराठा समाजाला तत्काळ आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी मराठा समाजाने आंदोलन पुकारले आहे. मागील आठ दिवसापासून राज्यभर हे आंदोलन तीव्र झाले असून अनेक ठिकाणी दगफेक, जाळपोळ, बंद, रास्तारोको होत असून एका मराठा तरुणाने बलिदान दिले आहे. याबाबत शासनाच्या भूमिकेचा निषेध करत मराठा आरक्षणाला पाठिंबा देत माजलगाव पंचायत समितीचे उपसभापती सुशील सोळंके यांनी आज त्यांच्या पदाचा राजीनामा सभापती अलका नरवडे, गटविकास अधिकारी बी.टी. चव्हाण यांच्याकडे सुपूर्द केला. याप्प्रकरणी राज्यभर राजीनामा सत्र सुरु झाले असताना सुशील सोळंके यांचा राजीनामा बीड जिल्ह्यातील पहिला राजीनामा ठरला आहे.
यावेळी राजेंद्र होके, जयदत्त नरवडे, चंद्रकांत वानखेडे, प्रताप रांजवन, पांडुरंग काशीद, रामराजे रांजवन, महेश ठोंबरे, पप्पु घाडगे, राजाभाऊ शेजूळ यांच्यासह तालुक्यातील शेकडो मराठा तरुण पंचायत समिती सभागृहात उपस्थित होते.
दरम्यान, बुधवारी राज्य शासनाचा निषेध म्हणून कन्नडचे आ. हर्षवर्धन जाधव व वैजापूरचे आ. भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांनी पदाचा राजीनामा दिलेला आहे. याच पार्श्वभूमीवर जालन्याचे उपनगराध्यक्ष राजेश रामभाऊजी राऊत यांनीसुद्धा आज सकाळी जिल्हाधिकाऱ्यांकडे पदाचा राजीनामा दिला.