लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत गरीब व गरजू रुग्णांचे जीव वाचविण्यासाठी आष्टी तालुक्यातील सावरगाव येथील श्रीक्षेत्र मच्छिंद्रनाथ देवस्थानची धडपड सुरू आहे. देवस्थानने बीड जिल्ह्यात पाच ठिकाणी एका हॉस्पिटलसह चार कोरोना विलगीकरण कक्षाची उभारणी केली आहे. या सर्व ठिकाणी जवळपास ३०० रुग्ण उपचार घेत आहेत. देवस्थानच्या देणगीतून व लोकवर्गणीतून हे कोविड सेंटर गरीब, निराधारांसाठी आधार केंद्रच बनले आहे.
सावरगाव येथे मच्छिंद्रनाथांची संजीवन समाधी आहे. येथे राज्यभरातून भाविक दर्शनासाठी येतात. भाविकांच्या देगणीतून देवस्थान परिसरात विविध विकास कामे सुरू आहेत; परंतु कोरोनामुळे गेल्या दीड वर्षापासून मंदिरे बंद आहेत. त्यामुळे भाविकांची संख्या रोडावली आहे. यामुळे मदतीचा ओघही थांबला आहे; परंतु देवस्थानच्या विश्वस्तांनी आ. सुरेश धस यांच्या मार्गदर्शनाखाली देवस्थानचे सर्व विकास कामे थांबवून सामाजिक बांधिलकी म्हणून कोरोना महामारीसारख्या संकटाचा मुकाबला करण्यास प्राधान्य दिले आहे. देवस्थानच्या वतीने आष्टी तालुक्यातील कडा येथे अमोलक जैन विद्यालयात १०० बेडचे सुसज्ज असे आईसाहेब नावाने कोविड सेंटरची उभारणी केली आहे. यात २० ऑक्सिजन बेड आहेत. डॉ. शरद मोहरकर हे सामाजिक बांधिलकीतून कोरोना रुग्णांवर उपचार करीत आहेत. आष्टी तालुक्यातील सावरगाव, पाटोदा तालुक्यातील नायगाव मयूर, पाटोदा, कुसळंब येथे प्रत्येकी ५० बेडचे विलगीकरण कक्ष उभारले आहे. या सर्व विलगीकरण कक्षात होम क्वारंटाइन रुग्णांना दाखल केले आहे. येथे सर्व सुविधा मोफत मिळत आहेत. देवस्थानच्या वतीने रुग्णांना जेवणाची, राहण्याची, पाण्याची व्यवस्था केली आहे. शासनातर्फे मोफत औषधे पुरविली जात आहेत. पाच सेंटरवर रुग्णांंना देवस्थान अन्नधान्य व इतर साहित्य पुरवीत आहे. मागील वर्षीही देवस्थानने गरजूंना अन्नधान्य, सॅनिटायझर, मास्क व अनेक गावांत धूर फवारणीचे उपक्रम राबिवले होते.
...
मनुष्यबळाचा पुरवठा
देवस्थानच्या वतीने सर्व कोरोना विलगीकरणावर मनुष्यबळ पुरविण्याचे काम करीत आहे. कोरोना टेस्टिंगसाठी देवस्थानने पाच जणांची टीम तयार केली आहे. येथे उत्स्फूर्तपणे युवक काम करीत आहेत. त्यांना संस्थानच्या वतीने मानधनदेखील देण्यात येत आहे. जेवणासाठी अन्नधान्य ने-आण करण्यासाठी वाहतुकीची व्यवस्थाही केली आहे.
...
श्री मच्छिंद्रनाथ महाराजांवर श्रद्धा ठेवून देवस्थानचे सर्व पदाधिकारी काम करीत आहेत. देवस्थानच्या कोरोना विलगीकरणात येणारा ९५ टक्के रुग्ण हा गरीब, निराधार आहे. बाबांवर श्रद्धा ठेवून उपचार घेऊन तो सुखरूप परत जात आहेत. याचे समाधान ट्रस्टला आहे. आ. सुरेश धस यांच्या देखरेखीखाली कामकाज सुरू आहे. दिवस-रात्र संस्थानचे पदाधिकारी युवराज म्हस्के, बाबासाहेब म्हस्के, सरपंच राजेंद्र म्हस्के, अनिल म्हस्के, नवनाथ म्हस्के, रमेश ताठे व कर्मचारी, परिसरातील युवक, ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत.
-दादासाहेब चितळे, अध्यक्ष, मच्छिंद्रनाथ देवस्थान ट्रस्ट, सावरगाव, ता. आष्टी, जि. बीड.
===Photopath===
080521\08_2_bed_11_08052021_14.jpg~080521\08_2_bed_9_08052021_14.jpg
===Caption===
IMG~ओ