बीड : संघर्षातून निर्माण झालेल्या महाज्योतीचा बट्ट्याबोळ सहन केला जाणार नाही. सारथीप्रमाणे महाज्योतीमध्ये ५०० जागांची तरतूद करा, अशी मागणी महात्मा फुले समता परिषदेचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष तथा बीड जिल्हाध्यक्ष ॲड. सुभाष राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली.
अनेक वर्षांच्या संघर्षानंतर ओबीसींचे राष्ट्रीय नेते छगन भुजबळ यांच्या अथक प्रयत्नातून ओबीसी, भटक्या जाती-जमाती व विशेष मागास प्रवर्गासाठी महात्मा जोतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेची (महाज्योती) निर्मिती करण्यात आलेली आहे. मात्र महाज्योतीचा कार्यभार सांभाळण्यासाठी नियुक्त केलेल्या संचालक मंडळ व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी महाज्योतीकडे पूर्णतः दुर्लक्ष केले. मागील आर्थिक वर्षात मंजूर झालेल्या निधीपैकी १२५ कोटींचा निधी संचालक मंडळ आणि अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळेच शासनाकडे परत गेला आहे. महाज्योतीसाठी पूर्णवेळ कायमस्वरूपी व्यवस्थापकीय संचालक नियुक्त करून सारथीप्रमाणेच महाज्योतीमध्ये ३५० वाढीव जागांची तरतूद करून ५०० जागांसाठी नवीन सुधारित जाहिरात प्रसिद्ध करण्यात यावी, जेणेकरून ओबीसी, भटक्या विमुक्त जाती- जमाती आणि विशेष प्रवर्गातील विद्यार्थ्यांना न्याय मिळेल, अशी मागणी ॲड. राऊत यांनी केली.
ओबीसी भटक्या जाती-जमाती आणि विशेष प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या हितासाठी स्थापन केलेल्या महाज्योती या प्रशिक्षण संस्थेत नियमाप्रमाणे १६ अधिकारी, कर्मचारी यांचा कार्यभार मंजूर आहे. मात्र तो कार्यरत करण्यासाठी कुठलेही प्रयत्न झालेले नाहीत. व्यवस्थापकीय संचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार गोंदिया जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप डांगे यांच्याकडे दिलेला आहे. अतिरिक्त कार्यभार असल्यामुळे महाज्योतीकडे त्यांचे पूर्णतः दुर्लक्ष आहे. नियमाप्रमाणे दरमहा संचालक मंडळाच्या सभा होणे आवश्यक आहे. मात्र आजपर्यंत फक्त दोन सभा झाल्या असल्यामुळे महाज्योतीमध्ये नेमके काय सुरू आहे, हे संचालकांनासुद्धा कळत नाही, असे राऊत यांनी निवेदनात म्हटले आहे.
छगन भुजबळ यांच्या पाठपुराव्यामुळे मागील आर्थिक वर्षात महाज्योतीला सुमारे १५५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून सदरील निधी त्या वर्षात खर्च करणे आवश्यक होते. मात्र व्यवस्थापकीय संचालकांनी या योजनांची अंमलबजावणी टाळली. म्हणून प्रदीप डांगे यांना तात्काळ कार्यमुक्त करून कायमस्वरूपी पूर्णवेळ व्यवस्थापकीय संचालक नियुक्त करावा, अशी मागणीही ॲड. राऊत यांनी केली आहे.
===Photopath===
280521\28bed_8_28052021_14.jpg
===Caption===
सुभाष राऊत