बीड : गौरी गणपतीच्या सणाला महालक्ष्मी पूजन केले जाते. सोळा भाज्यांचा नैवेद्य असतो. महालक्ष्मीची आवडती फळभाजी म्हणून पडवळाला या काळात चांगली मागणी असते. बीड तालुक्यातील आहेर वडगाव येथील शेतकरी सुदाम भानुदास वाघमारे पाटील यांनी पडवळ लागवडीतून चांगले उत्पन्न मिळवित प्रगतीची वाट धरली आहे. लांबलचक आणि आगळ्या आकारामुळे पडवळची वेल पाहणाऱ्यांना भुरळ घालते. बीड जिल्ह्यात मोजकेच शेतकरी पडवळचे पीक घेतात. १२० दिवसांचे पीक असून आयुर्वेदिकदृष्ट्या याचे महत्त्व मानले जाते. एरवी मागणी नसतेच, पण महालक्ष्मीच्या पूजनाला हमखास पडवळाची मागणी लक्षात घेऊन वाघमारे यांनी मागील १५ वर्षांपासून लागवडीत सातत्य राखले आहे. पाच वर्षांपूर्वी त्यांनी लोखंडी पाइन, तार, लाकडी तंडूच्या मदतीने त्यांनी मांडव केला. औषधी, खतांची मात्रा देत दक्षता घेत पडवळीच्या पिकातून चांगले उत्पन्न घेत आहेत. दरवर्षी अडीच टन उत्पादन ते घेतात. औरंगाबाद आणि बीडच्या बाजारात पडवळ विकतात. भावही शंभर रुपये किलो आहे.
पडवळातून महालक्ष्मी प्रसन्न.....
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2021 4:38 AM