बीड : तुकाराम बिजेच्या पुण्यतिथीवर श्री क्षेत्र रामगड येथील मठाधिपती लक्ष्मण महाराज यांचे अल्पशा आजाराने ३० मार्चरोजी निधन झाले. या घटनेने पंचक्रोशीतील भाविक-भक्तांमध्ये शोककळा पसरली असून, भाविकांच्या उपस्थितीत अंत्यविधी करण्यात आला.
बीड शहराच्या जवळच असलेल्या श्री क्षेत्र रामगड हे पुरातन धार्मिक संस्थान आहे. प्रभू श्रीरामाच्या वास्तव्याने पावन झालेले ठिकाण व थोरला गड म्हणून प्रसिद्ध आहे. याचा उल्लेख पौराणिक ग्रंथांमध्ये आढळतो. गुरू- शिष्याच्या परंपरेने या तीर्थक्षेत्रावरील गादी चालते. रामगडावर दरवर्षी रामनवमीचा उत्सव आणि विविध धार्मिक कार्यक्रम साजरे केले जातात. पंचक्रोशीतील सुमारे ८० गावांत रामगडाच्या माध्यमातून वार्षिक हरिनाम सप्ताह साजरे केले जातात. लक्ष्मण महाराज यांनी पंचक्रोशीतील नागरिकांना वेळोवेळी व्यसनमुक्तीची शिकवण दिली. भागवत धर्माचा प्रचार आणि प्रसार शेवटच्या क्षणापर्यंत केला. धर्माचे आचरण करीत स्वावलंबी वृत्तीने रामगडाचा विकास आणि प्रगती साधली. जिल्ह्यात आज हजारो शिष्यगण त्यांना गुरुस्थानी मानतात. येथील मठाधिपती लक्ष्मण महाराज हे मागील अठवडाभरापासून आजारी होते. शहरातील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मंगळवारी सकाळी त्यांना देवाज्ञा झाली. गडावर सायंकाळच्यासुमारास भक्तांच्या व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नारायणगडाचे मठाधिपती शिवाजी महाराज, बंकटस्वामी संस्थानचे मठाधिपती लक्ष्मण महाराज मेंगडे, मच्छिंद्र गडाचे शिंदे महाराज, दत्त देवस्थान लोळदगाव वसंत महाराज, हनुमान टेकडी येथील शिवाजी महाराज येवले, भाटेपुरी संस्थानचे शिवाजी महाराज, मोरदरा येथील हरिहर महाराज यांच्यासह आ. संदीप क्षीरसागर, माजी मंत्री बदामराव पंडित, बबनराव गवते, रामगडाचे विश्वस्त राजेंद्र मस्के, भीमराव मस्के, प्रा. शिवराज बांगर, शाहेद पटेल यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.
===Photopath===
300321\302_bed_18_30032021_14.jpg
===Caption===
ह.भ.प.लक्ष्मण माहराज