बीड : छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा कोरोनामुळे पहिल्यांदाच मिरवणुकीविना साजरा होणार आहे. असे असले तरी सामाजिक उपक्रम आणि कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे. यासाठी जिल्ह्यात शिवप्रेमींनी जय्यत तयारी केली आहे. झेंडे, कमानीमुळे बीड शहर भगवेमय झाले आहे.
बीड शहरात सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्यावतीने प्रत्येक वर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. झांझ पथक, ढोल पथक, देखावे, दांडपट्टा हे मिरवणुकीचे खास आकर्षण असते. महिलांसाठी दोन खेळ राखीव ठेवले जातात. या समितीसह जिल्हाभरात सर्वत्र मिरवणुका काढून महाराजांचा जन्मोत्सव साजरा केला जातो; परंतु यावर्षी कोरोनामुळे मिरवणुकीला बंदी घालण्यात आली आहे. कोरोना हा संसर्ग गर्दीमुळे पसरण्याची शक्यता असते. यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका पोहचू नये, हा या मागचा उद्देश आहे. या कोरोना परिस्थितीमुळेच पहिल्यांदाच महाराजांचा जन्मोत्सव मिरवणुकीविना शिवप्रेमी साजरा करणार आहेत. असे असले तरी गाव, शहरे झेंड्यानी भगवेमय झाले आहे. महाराजांच्या स्वागताला शिवप्रेमींचा उत्साह शिगेला पोहोचल्याचे गुरुवारी दिसले.
बीडमध्ये शासकीय महापूजा
बीड शहरात छत्रपती शिवाजी महाराजांची सकाळी ७ वाजता शासकीय महापूजा होईल. येथे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह सर्व अधिकारी, लोकप्रतिनिधी, संघटना, समिती, शिवप्रेमी उपस्थित असतात. दिवसभर महाराजांना अभिवादन करण्यासाठी गर्दी होत असते. पालिकेने महाराजांच्या पुतळ्याभोवती आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. त्यामुळे परिसर उजळून निघाला आहे.
रक्तदान शिबिर, मास्कचे वाटप
बीडमध्ये सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे, तसेच मास्कचेही वाटप होणार आहे. शहरात अडीच हजार छोटे मोठे झेंडे लावले आहेत. मिरवूणक टाळून सामाजिक उपक्रमांवर भर दिला आहे. प्रशासनाच्या नियमांचे पालन करून हा सोहळा आदर्श पद्धतीने साजरा केला जाईल, असे समितीचे अध्यक्ष मुकूंद भोसले यांनी सांगितले.