Maharashtra Assembly Election 2024 : बीड : राज्याचे लक्ष असलेल्या परळी मतदारसंघासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी भाकरी फिरवत धनंजय मुंडे यांच्याविरोधात काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन शरद पवार गटात आलेल्या राजेसाहेब देशमुख यांची उमेदवारी जाहीर केली आहे.
येथून काही ओबीसी नेते इच्छुक असतानाही पवारांनी परळीत मराठा चेहरा म्हणून देशमुखांना उमेदवारी दिली, तर माजलगावातून दोन दिवसांपूर्वीच प्रवेश केलेल्या रमेश आडसकरांना ‘हाबाडा’ देत मोहन जगतापांना उमेदवारी जाहीर केली आहे. बीड आणि आष्टी मतदारसंघांमधून महाविकास आघाडीने उमेदवार जाहीर केले असले तरी महायुतीकडून अद्यापही उमेदवार देण्यात आलेले नाहीत.
गेवराईत काका-पुतण्या लढतगेवराई मतदारसंघात महाविकास आघाडीकडून उद्धवसेनेचे बदामराव पंडित आणि महायुतीकडून अजित पवार गटाचे विजयसिंह पंडित यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. या पंडित काका-पुतण्यात पुन्हा एकदा लढत होणार आहे. याच ठिकाणी भाजपचे विद्यमान आ. लक्ष्मण पवारही अपक्ष लढण्याच्या तयारीत आहेत.
माजलगावात आडसकर करणार बंडखोरीभाजपचे नेते रमेश आडसकर यांनी दोन दिवसांपूर्वीच शरद पवार गटात प्रवेश केला होता. त्यांना माजलगावातून उमेदवारी देण्याचा शब्द दिला होता. परंतु, ऐनवेळी मोहन जगताप यांना उमेदवारी जाहीर झाल्याने आता आडसकर बंडखोरी करण्याची दाट शक्यता आहे.
आष्टीत विद्यमान आमदार वेटिंगवरच - आष्टीत महायुतीकडून अजित पवार गटाचे विद्यमान आ. बाळासाहेब आजबे, भाजपचे माजी आ. भीमराव धोंडे आणि सुरेश धस इच्छुक आहेत. त्यामुळे येथून उमेदवारी दिलेली नाही. अशीच परिस्थिती बीडमध्ये आहे. येथील जागेवर शिंदेसेना दावा करत असून, जिल्हाप्रमुख अनिल जगताप इच्छुक आहेत. अजित पवार गटाकडून डाॅ. योगेश क्षीरसागर इच्छुक असून, त्यांच्यासाठी धनंजय मुंडे व पंकजा मुंडे यांनी ताकद लावली आहे.