राजकारण करावं तर समोरासमोर करावं...; संदीप क्षीरसागर यांची फेसबुक पोस्ट चर्चेत!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2024 05:18 PM2024-10-23T17:18:46+5:302024-10-23T18:03:01+5:30

विधानसभा निवडणुकीत संदीप क्षीरसागर यांना बीडमधून उमेदवारी मिळणार की नाही, याबाबत तर्क-वितर्क लढवले जात आहेत.

Maharashtra assembly vidhan sabha election 2024 ncp sp Sandeep Kshirsagars Facebook post viral | राजकारण करावं तर समोरासमोर करावं...; संदीप क्षीरसागर यांची फेसबुक पोस्ट चर्चेत!

राजकारण करावं तर समोरासमोर करावं...; संदीप क्षीरसागर यांची फेसबुक पोस्ट चर्चेत!

Beed Sandip Kshirsagar ( Marathi News ) : यंदाच्या विधानसभा निवडणुकीत बीड जिल्ह्यात कोण वरचढ होणार, याबाबत सर्वत्र उत्सुकता आहे. कारण लोकसभा निवडणुकीत बीडमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात मोठा संघर्ष पाहायला मिळाला होता. या संघर्षात बीड शहर मतदारसंघातील आमदार संदीप क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बजरंग सोमवणे यांची ठामपणे साथ दिली होती. मात्र आता विधानसभा निवडणुकीत क्षीरसागर यांना उमेदवारी मिळणार की नाही, याबाबत तर्क-वितर्क लढवले जात आहेत. अशातच आज संदीप क्षीरसागर यांनी फेसबुकवर लिहिलेल्या पोस्टची राजकीय वर्तुळात चर्चा रंगत आहे.

माझं फेसबुक पेज बंद पाडण्याचा काही व्यक्तींना प्रयत्न केल्याचा आरोप संदीप क्षीरसागर यांनी केला आहे. आमदार क्षीरसागर यांनी लिहिलेल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे की, "माझ्या राजकीय विरोधकांनी माझ्याविरोधात कटकारस्थान करणे सुरू केलं आहे. मागील आठ दिवसांपासून फेसबुक पेज जाणीवपूर्वक बंद पाडण्यात आलं होतं. समाजमाध्यमांवर माझा प्रचार-प्रसार होऊ नये यासाठी हा प्रयत्न केला गेला. काही मित्रांच्या सहकार्याने फेसबुक पेज पुन्हा सुरू करण्यात यश आलं आहे. राजकारण करावं तर समोरासमोर करावं अशी माझी भूमिका असते. अशा प्रकारे फेसबुक पेज बंद पाडून निवडणुका जिंकता येत नसतात. कदाचित पुन्हा काही तांत्रिक अडचणी निर्माण करून तुम्ही मला फेसबुक वरून बाहेर कराल. परंतु माझ्या बीडकरांच्या मनातून मला कसे बाहेर करणार," असा सवाल क्षीरसागर यांनी आपल्या राजकीय विरोधकांना विचारला आहे.

"मी बीडचा आहे आणि बीड माझे आहे, हे नातं कधीच संपणार नाही," असंही संदीप क्षीरसागर यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, संदीप क्षीरसागर यांनी फेसबुकवर शरद पवार यांच्यासोबतचा एक फोटोही पोस्ट केला असून त्यावर एकनिष्ठ असं लिहीत आपण पक्षासोबतच असल्याचं जाहीर केलं आहे.

बीडमध्ये कोणाला मिळणार तिकीट?

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून यंदा बीड विधानसभा मतदारसंघातून कोणाला उमेदवारी दिली जाणार, याबाबत सस्पेन्स निर्माण झाला आहे. कारण  शिवसंग्राम संघटनेचे नेते दिवंगत विनायक मेटे यांचे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे शरद पवार हे ज्योती मेटे यांना संधी देणार की पुन्हा संदीप क्षीरसागर यांच्या नावावरच शिक्कामोर्तब करणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 
 

Web Title: Maharashtra assembly vidhan sabha election 2024 ncp sp Sandeep Kshirsagars Facebook post viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.