BJP Suresh Dhas ( Marathi News ) : "मला महायुतीची उमेदवारी मिळालेली असताना शेवटच्या दिवशी पावणेतीन वाजता बाळासाहेब आजबे यांना अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा एबी फॉर्म देण्यात आला. हे कसलं राजकारण आहे? आणि एबी फॉर्म मिळताच त्यांनी मोठ्या आवाजात सांगितलं की मला राष्ट्रवादीचा एबी फॉर्म मिळाला आहे. जसं काय त्यांना डोनाल्ड ट्रम्प यांच्या पक्षाचाच एबी फॉर्म मिळाला होता. आधीच तुमच्या घड्याळाचे १२ वाजले आहेत. लोकांची भावना घड्याळाकडे कुठे आहे? लोकांची भावना तुतारीकडे, मोठ्या पवारांकडे आहे. छोट्या पवारांकडे लोकांची भावना नाही," अशा शब्दांत भाजपचे विधानपरिषद आमदार आणि आष्टी मतदारसंघातील उमेदवार सुरेश धस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे.
आष्टी मतदारसंघात भाजपकडून सुरेश धस यांना उमेदवारी देण्यात आल्यानंतरही अजित पवार यांनी बाळासाहेब आजबे यांना राष्ट्रवादीचा एबी फॉर्म दिला. त्यामुळे आष्टीत महायुतीत धुसफूस पाहायला मिळत आहे. अशातच भाजप उमेदवार सुरेश धस यांनी आपल्या प्रचारादरम्यान अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा खरपूस समाचार घेत लोकांची भावना घड्याळासमोर नसून शरद पवारांच्या पक्षाच्या तुतारीसोबत आहे, असं वक्तव्य केलं आहे.
पुढे बोलताना सुरेश धस म्हणाले की, "आष्टी मतदारसंघात घड्याळाचं चिन्ह का देण्यात आलं? कमळाची मतं कमी करण्यासाठीच हे चिन्ह देण्यात आलं आहे. मी तर म्हणत होतो की, कोणीच चिन्ह घेऊ नका. सगळे अपक्ष लढा आणि आपली ताकद दाखवा. आष्टी मतदारसंघात याआधीही एकदा अशी निवडणूक झाली आहे. पण आता आपल्या मतदारसंघात जे राजकारण सुरू आहे ते तुम्ही ओळखा. फक्त एका माणसाला रोखण्यासाठी हे राजकारण सुरू आहे. हा माणूस निवडून आला तर आपल्याला जे करायचंय ते करता येणार नाही, म्हणून हे राजकारण सुरू आहे," असा आरोप धस यांनी केला आहे.
महायुतीत गेवराईच्या बदल्यात आष्टीची जागा भाजपने घेतली. याठिकाणी अजित पवार गटाचे विद्यमान आमदार बाळासाहेब आजबे यांना डावलून सुरेश धस यांना भाजपने उमेदवारी दिली. मात्र, आमदार आजबे यांनी देखील नंतर अजित पवार राष्ट्रवादी पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केल्याने महायुतीमध्ये सर्व आलबेल नसल्याचे पुढे आले.
दरम्यान, आष्टीतून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने युवकचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांना संधी दिली असून भीमराव धोंडे हे अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात असल्याने आष्टीत चौरंगी सामना पाहायला मिळत आहे.