माजलगाव : महाराष्ट्रात झालेल्या राजकीय भूकंपानंतर राष्ट्रवादीत शरद पवार की अजित पवार अशी उभी फुट पडली आहे. अजित पवार यांच्या भूमिकेवर उलटसुलट चर्चा असताना आज सकाळी शपथविधीच्या वेळेस अजित पवार यांच्यासोबत असलेले राष्ट्रवादीचे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी आम्ही संभ्रमावस्थेत आहोत, मात्र शरद पवार यांना विचारल्याशिवाय अजित पवार असा निर्णय घेऊच शकत नाहीत, असा गौप्यस्फोट केला आहे.
मोठ्या राजकीय उलाढालीनंतर राज्यात भाजपने सत्ता स्थापन केली आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादीला पक्षातील काही आमदारासोबत भाजपसोबत हातमिळवणी केली व उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. या घडामोडी दरम्यान माजलगावचे राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके अजित पवार यांच्यासोबत होते. ते सध्या मुंबईत असून लोकमत प्रतिनिधीने त्यांच्याशी संपर्क साधला असता 'एकीकडे पवारसाहेब दुसरीकडे अजितदादा आहेत. मी साधा आमदार आहे, काय करावे ही संभ्रवस्था आहे. शरद पवार आणि अजित पवार यांच्यात काय चालले आहे हे कळत नाही. परंतु, पवारसाहेबांच्या समंतीशिवाय अजितदादा असे करूच शकत नाहीत अशी माझी भावना असल्याचा गोप्यस्फोट केला'. तुम्ही कोणाकडे आहात या प्रश्नावर अजून काही सांगता येत नाही,येत्या 30 तारखेला सर्व काही स्पष्ट होईल असेही आमदार सोळंके यांनी सांगितले.