बीड : कॉंग्रेसचे सरचिटणीस प्रा. टी.पी. मुंडे यांनी आज पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला आहे. या माध्यमातून पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादीला-कॉंग्रेस आघाडीला आणखी एक धक्का दिला आहे. परळीत कार्यकर्ता मेळाव्यात त्यांनी पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. यावेळी चुलत्यासारखे पंकजा मुंडे यांच्या पाठीशी उभा राहील अशी ग्वाही प्रा. मुंडे यांनी दिली.
परळी विधानसभा मतदारसंघाची निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष आहे. भाजपच्या मंत्री पंकजा मुंडे यांच्या विरोधात त्यांचे चुलत भाऊ धनंजय मुंडे पुन्हा एकदा उभे आहेत. शनिवारी अर्ज छाननीच्या दिवशी परळीत मोठे राजकीय उलटफेर पाहायला मिळाले. कॉंग्रेसचे राज्य सरचिटणीस प्रा. टी.पी. मुंडे यांनी कार्यकर्ता मेळावा घेत कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या कार्य पद्धतीवर नाराजी व्यक्त केली. तसेच कार्यकर्त्यांशी संवाद साधत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याची घोषणा केली. यानंतर पंकजा मुंडे यांच्या उपस्थित त्यांनी भाजपत प्रवेश केला.
यावेळी प्रा. मुंडे यांचे पुत्र प्रा.विजय मुंडे, मुलगी जयश्री गित्ते, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सूर्यकांत मुंडे, ओमप्रकाश सारडा, जनार्धन गाडे , प्रा. नरहरी काकडे, संजय जगतकर, दिलीप गित्ते, रामराव गिते, रघुनाथ डोळस , नितीन शिंदे, नवनाथ क्षीरसागर आदी पदाधिकाऱ्यांनी सुद्धा भाजपत प्रवेश केला.राष्ट्रवादी कॉंग्रेसचे केज येथील घोषित उमेदवार नमिता मुंडे यांच्या भाजप प्रवेशानंतर कॉंग्रेसमधून प्रा.मुंडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने पंकजा मुंडे यांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला आणखी एक धक्का दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.