परळीः पंकजा मुंडेंबाबत धनंजय मुंडेंनी आक्षेपार्ह विधान केल्याची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली. त्यानंतर धनंजय मुंडेंवर सत्ताधाऱ्यांकडून टीका केली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर धनंजय मुंडेंनी पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भात खुलासा केला आहे. मी भाषण करत असताना जे बोललो त्या क्लिपमध्ये एडिटिंग करून अर्थाचा अनर्थ काही नवीन भावांनी केला आहे. मी दोषी नसताना मला दोषी ठरवलं जातंय. मला असं वाटतंय की जग सोडूनच जावं, माझ्यासारख्या भावावरती एवढा अभद्र आरोप लावला जात असेल तर मला जीवनही नको, मलाही सख्ख्या तीन बहिणी आहेत, मला चुलत सहा बहिणी आहेत. मलाही तीन मुली आहेत.माझ्यावर असे आरोप लावल्यानं माझ्या तीन बहिणी, तीन मुली, बायको, आई यांना वेदना झाल्या आहेत. अशा प्रकारचं शेवटचं अस्त्र वापरून बहीण-भावाच्या नात्याला डाग लावायचा जो कोणी प्रयत्न केला आहे, त्याच्या मुळापर्यंत मी जाणारच आहे, पण नव्यानं आलेले भाऊ या बहीण भावाच्या नात्यात विष कालवण्याचा प्रयत्न करत आहेत. विड्यातली माझ्या सभेचं भाषण ऐकलं असेल तर मी एकही शब्द चुकीचा बोललेलो नाही. माझ्यावर तसे संस्कार नाहीत, असंही धनंजय मुंडेंनी स्पष्टीकरण दिलं आहे. मला आठवतं, कळतं त्यावेळेपासून मी माझ्या सख्ख्या बहिणींकडूनही कधी राखी बांधून घेतली नाही. रक्षाबंधन किंवा भाऊबीज मी पंकजाताई, प्रीतमताई आणि नंतर यशस्वी यांच्यासोबत साजरी करायचो. त्यांच्याकडूनच राखी बांधून घ्यायचो. मागच्या पिढीतही दोन भावांमध्ये काहींनी विष कालवलं आणि त्याचे परिणाम मी भोगतोय, आता या पिढीतही तोच प्रकार केला जातो. पण आमचं बहीण-भावाचं नातं हे रक्ताचं नातं आहे. या रक्ताच्या नात्यामध्ये माझ्या शब्दाच्या अर्थाचा अनर्थ कोणी काढला, याच्याबाबतीत मी खोलवर जाणार आहे. पंकजा मुंडेंबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यामुळे धनंजय मुंडेंना नोटीस बजावण्यात येणार आहे. विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराच्या अंतिम टप्प्यात परळी विधानसभा मतदारसंघात वैयक्तिक पातळीवर टीका टीपण्णी करण्यात आल्याने गालबोट लागलं. धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंवर टीका करताना, पंकजा यांना बहीणबाई म्हटले. तसेच आमच्या बहीणबाईंच्या शब्दाला किंमत आहे, कारण त्या गोपीनाथ मुंडेंच्या कन्या आहेत. तर, आम्ही पंडित आण्णांचे पुत्र असल्याने आमच्या शब्दाला कमी किंमत असल्याचे धनंजय यांनी म्हटले आहे.
Maharashtra Election 2019 : मलाही तीन मुली, पंकजा अन् माझं रक्ताचं नातं; धनंजय मुंडेंना अश्रू अनावर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2019 1:14 PM