परळी : पंकजाताई मुंडे यांनी त्यांच्याकडे असलेल्या मंत्री पदाचा वापर मतदारसंघाच्या विकासासाठी केला असता तर पंतप्रधान मोदी यांची मराठवाड्यातील सभा परळीत घेण्याची वेळ आली नसती. आता ही निवडणुक मी ज्या जनतेसाठी 24 वर्ष झटत आलो आहे, त्यांनीच हातात घेतल्यामुळे मोदी आले किंवा ट्रम्प जरी आले तरी आपलाच विजय निश्चित आहे, अशी कोपरखळी धनंजय मुंडे यांनी मारली. ते येथील 12 बलुतेदार संघटनेच्या मेळाव्यात बोलत होते.
18 पगड जाती व 12 बलुतेदारांना छत्रपती शिवरायांच्या शिवस्वराज्यामध्ये सन्मान होता, सत्तेत वाटा होता. परंतू, या सरकारने ठराविक लोकांनाच सत्तेचा वाटा दिला असून, 12 बलुतेदारांवर अन्याय केला आहे. आपण कायम या उपेक्षित समाजाच्या पाठीशी राहु असे सांगतानाच मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आघाडीचे सरकार राज्यात असताना सत्तेत मंत्रीपदावर सर्व समाजातील व्यक्तींना स्थान दिले, याची आठवण करून दिली.राष्ट्रवादी काँग्रेस हा पुरोगामी विचारांचा, सर्वसमावेशक पक्ष असून, आपण या पक्षाचा कार्यकर्ता असल्याचा अभिमान असल्याचेही मुंडे म्हणाले. यावेळी मला या निवडणुकीत आशीर्वाद द्या मी सर्व 12 बलुतेदार समाजाला सन्मानाने वागणूक देण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतो. तसेच नाभिक समाजासाठीच्या सभागृह बांधकामाची घोषणाही यावेळी मुंडे यांनी केली. त्याचबरोबर जीवा महाले व संत गाडगे महाराज यांचे भव्य स्मारक परळीत उभारणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून 12 बलुतेदार समाजाचे प्रदेशाध्यक्ष सतिश कसबे, ज्येष्ठ काँग्रेस नेते पंडीतराव दौंड, माकपचे पी.एस.घाडगे सर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष लक्ष्मणतात्या पौळ, शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, जिल्हा उपाध्यक्ष चंदुलाल बियाणी, सुरेशअण्णा टाक, काँगे्रसचे तालुकाध्यक्ष अॅड.अनिल मुंडे, काँग्रेसचे शहराध्यक्ष बाबुभाई नंबरदार, ज्येष्ठ नेते बाळासाहेब देशमुख, नाभिक महामंडळाचे मराठवाडा अध्यक्ष युवराज शिंदे, सोनार समाजाचे प्रदेशाध्यक्ष राजेश पंडीत, 12 बलुतेदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश कानगावकर, कुंभार समाजाचे जिल्हाध्यक्ष अर्जुन दळे, नाभिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष गुलाबराव चव्हाण, गवळी समाजाचे जिल्हाध्यक्ष मुन्ना बागवाले, वडार समाज संघटनेचे राज्य सचिव संजय देवकर, सुतार समाज संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष विष्णुबप्पा पांचाळ, महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे विभागीय संघटक कवीराज कचरे, रा.काँ.युवकचे प्रदेशाध्यक्ष डॉ.संतोष मुंडे, प्रा.डॉ.विनोद जगतकर, हरिश वाघमारे, अरविंद गायकवाड, चंद्रप्रकाश हालगे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाबुभाई नंबरदार यांनी तर पी.एस.घाडगे, सतिश कबसे, पंडीतराव दौंड यांचीही भाषणे झाली. तर कार्यक्रमाचे आयोजक संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष सुरेंद्र कावरे यांनी आभार मानले. यावेळी सोनार समाज संघटना, महाराष्ट्र नाभिक महामंडळ, परीट समाज संघटना, भावसार समाज संघटना, विश्वकर्मा समाज संघटना, गोंधळी समाज संघटना, लोहार समाज संघटना, गुरव समाज संघटना, शिंपी समाज संघटना आदी संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.