बीड - परळी मतदारसंघात पंकजा मुंडेंच्या समर्थकांनी केलेले आरोप आणि व्हायरल क्लिपसंदर्भात राष्ट्रवादीचे परळी मतदारसंघातील उमेदवार धनंजय मुंडेंनी खुलासा केला आहे. माझ्या वक्तव्याचा विपर्यास करुन ते चुकीची व्हिडीओ क्लिप बनविण्यात आल्याचं धनंजय मुंडेंनी म्हटलं आहे. धनंजय मुंडेंनी पंकजा यांच्यावर टीका करताना, आमच्या दोघात केवळ हाच फरक असल्याचं सांगत त्यांना टार्गेट केलं होतं. मी पंडित आण्णांच्या घरात जन्माला आलो आणि त्या गापीनाथ मुंडेंच्या घरात जन्माला आल्या. त्या मोठ्याच्या पोटी जन्माला आल्या, असे म्हणत धनंजय यांनी पंकजा मुंडेंवर टीका केली होती.
सोशल मीडियावर धनंजय मुंडेंनी पंकजा यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याची व्हिडीओ क्लिप व्हायरल झाली आहे. या क्लिपनंतर धनंजय मुंडेंना महिला आयोगाकडून नोटीसही बजावण्यात येणार आहे. याप्रकरणी धनंजय मुंडेंनी पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली, यावेळी नात्यावरील अर्वाच्य टीका-टीपण्णीमुळे ते भावनिक झाल्याचं पाहायला मिळालं
''मला सहा बहिणी आहेत, मलाही तीन मुली आहेत. बहिण-भावाच्या नात्याला ज्यांनी डाग लावायचा प्रयत्न केला हे दुर्दैवी आहे. नव्याने आलेले लोकच बहिण-भावाच्या नात्यामध्ये विष कालवायचा प्रयत्न करत आहेत. माझी बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. याबाबत मीही फिर्याद दाखल केली, पण पोलिसांनी माझी फिर्याद घेतली नाही. काहींना तर वाटतंय मी पृथ्वीतलावरच नसलो पाहिजे, हे मला खूप वेदनादायी आहे'', असे धनंजय मुंडेंनी म्हटले.
आपण सर्वांनी माझे आजपर्यंतचे भाषण पाहा, माझ्या बहिणीच्या बाबतीत मी कधीही-कुठेही आक्षेपार्ह बोललो नाही. मी केवळ सरकार आणि मंत्र्यांवर टीका करण्याचा राजधर्म पाळत आलो. 17 तारखेचं माझं भाषण एटिड करुन व्हायरल करण्यात आलंय, हे कशासाठी?. मी 2009 साली या मतदारसंघाचा त्याग केला, माझ्या बहिणीला मी निवडूण आणलं. जगाव का मरावं या मानसिक स्थितीत मी आहे. ज्याला तुम्ही 5-7 वर्षापूर्वी खलनायक ठरवत होता, तो आज स्वत:च्या कर्तृत्वावर नायक झालाय म्हणून ते तुम्हाला बघवत नाही, असे म्हणत धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेच्या गटातील काही स्थानिक नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत, असा खुसाला मुंडेंनी केलाय. तसेच, मी तसं विधान केलंच नसून त्याची फॉरेन्सिक लॅबमध्ये तपाणसी करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.