बीड : माजलगाव विधानसभा मतदारसंघातील वडवणी तालुक्यातील खळवट निमगाव येथील नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने भीम नाईक तांडा येथील ६५ मतदार पुरात अडकले. त्यांना वडवणी तहसीलदार आणि त्यांच्या पथकाने होडीच्या सहाय्याने मतदान केंद्रावर आणत मतदानाचा हक्क बजावण्यात मदत केली.तत्काळ कार्यवाही करत मतदारांना मतदानाचा अधिकार बजावण्यात मदत केल्याने तहसीलदार सुरेखा स्वामी व यांच्या पथकाचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय पांडे यांनी अभिनंदन केले.
जिल्ह्यात दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. सोमवारी मतदानाच्या दिवशीसुद्धा काही मतदार संघात सकाळपासून पावसाचा जोर कायम होता. माजलगाव विधानसभा मतदारसंघातील खळवट निमगाव येथे सकाळी ८ पर्यंत ६४ मि. मी. पावसाची नोंद झाली. त्यामुळे देव नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली. भीम नाईक तांडा येथील जवळपास ६५ मतदारांना पूर वाढल्याने मतदान केंद्रापर्यंत पोहचण्यास अडथळा येत होता. येथील केवळ १४ मतदारांनी पूर येण्याच्या आधी मतदान केले होते.
अनेक मतदार पुरात अडकल्याची माहिती वडवणीच्या तहसीलदार सुरेखा स्वामी यांना मिळाली. त्यांनी तत्काळ मंडळ अधिकारी व तलाठी यांच्या मदतीने मदतकार्य सुरु केले. देवगाव येथील भोई समाजाच्या काही नागरिकांकडून थर्माकोलची होडी (चप्पू) घेतली व मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणले. यानंतर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सर्व मतदारांनी तहसीलदार स्वामी आणि त्यांच्या टीमचे आभार मानले. याबाबत अधिकारी कर्मचाऱ्यांचे जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडेय यांनी अभिनंदन केले आहे.