बीड : राजकीय पक्ष आणि उमेदवार प्रचारासाठी सोशल मिडीयाचा मोठ्याप्रमाणावर वापर केला जात आहे. तरुण मतदारांची संख्या जास्त असल्याने त्यांना आकर्षित करण्यासाठी सोशल मिडीयावर सर्वांचा भर आहे. यामुळेच जनजागृतीसाठी सुद्धा पोलिसांनी आता सोशल मिडीयाचा वापर सुरु केला आहे. बीड पोलिसांची निर्मिती असलेला 'आम्ही दक्ष, मतदारांचा पक्ष !' हा मतदार जनजागृती करणारा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. विविध प्रलोभने, धमकी देऊन मतदारांवर दबाव आणला जातो. अशा प्रवृत्तींना बळी न पडता त्यांची तक्रार कुठलीही भीती न बाळगता करावी आणि निर्भीडपणे मतदान करावे असा असा संदेश या लघुपटाद्वारे बीड पोलिसांनी दिला आहे.
लघुपटाची संकल्पना पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दर यांची असून याचे सर्व चित्रीकरण बीड तालुक्यातील ताडसोन्ना या गावी करण्यात आले आहे. तसेच यात अभिनय करणारे सर्व कलाकारसुद्धा स्थानिक आहेत. नागरिकांनी निःपक्षपातीपणे व निर्भीडपणे मतदान करावे. त्यांच्या सुरक्षेसाठी पोलीस सज्ज आहेत असा संदेश या माध्यमातून देण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दर यांनी पत्रकारपरिषदेत दिली. यावेळी अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांची उपस्थिती होती.
या लघुपटाचे दिग्दर्शन आरती बागडी यांनी केले आहे. विशेष म्हणजे प्रसिद्ध दिग्दर्शक सुभाष घई हा लघुपट ट्विट करत दिग्दर्शक बागडी आणि बीड पोलीस दलाचे कौतुक केले आहे.