- पुरूषोत्तम करवा
माजलगाव : राष्ट्रीय टेनिस व्हॉलीबॉल स्पर्धा केरळ राज्यातील कासारगोड, उदमा येथे दि.२८ व २९ मार्च रोजी घेण्यात आल्या. या स्पर्धेत निकिता शिवाजी थावरे कर्णधार असलेल्या महाराष्ट्राच्या युथ गट मुलींच्या संघाने जेतेपद पटकावले आहे. अंतिम सामन्यात महाराष्ट्राच्या संघाने छत्तीसगढवर २-१ ने विजय मिळवला. विशेष म्हणजे या संपूर्ण स्पर्धेत माजलगाव तालुक्यातील आनंदगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या खेळाडूंनी मुले आणि मुली अशा दोन्ही संघाचे प्रतिनिधित्व करत नेत्रदीपक यश संपादन केले.
महाराष्ट्राच्या मुलींच्या संघाने पहिल्या सामन्यात आंध्रप्रदेशला २-० ने, दुसऱ्या सामन्यात कर्नाटकला २- ० ने आणि तिसऱ्या सामन्यात तमिळनाडूला २-० हरवत अंतिम सामना गाठला. छत्तीसगढ संघासोबत अत्यंत अटीतटीच्या झालेल्या सामन्यात महाराष्ट्राच्या संघाने २-१ ने बजी मारली. या सामन्यात प्रणिता थावरेने उत्कृष्ट खेळ सादर करीत महाराष्ट्राकडे विजय खेचून आणला.
याशिवाय याच स्पर्धेत मिनी गटातील मुलांच्या संघाने उपविजेतेपद पटकावले आहे. या संघाचे नेतृत्व हर्षवर्धन हनुमान थावरे याने केले. तर मिनी गट मुलीच्या संघाने कर्णधार रूपाली नामदेव साखरे हिच्या नेतृत्वाखाली देशात तृतीय क्रमांक पटकावला. तसेच रूपाली नामदेव साखरे व कार्तिक केशव साखरे यांनी मिनी गट मिश्र दुहेरीत देशात द्वितीय क्रमांक पटकावला. तर कर्णधार कोरडे प्रमोद रामेश्वर यांच्या नेतृत्वाखाली युथ गट मुलांच्या संघाने देशात द्वितीय स्थान पटकावले.
ही सर्व मुले माजलगाव तालुक्यातील ग्रामीण भाग असलेल्या आनंदगाव जिल्हा परिषद शाळेतील असून महाराष्ट्र संघाचे प्रशिक्षक म्हणून राज सोनपसारे यांनी मार्गदर्शन व प्रशिक्षण दिले आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांच्या मनात स्वप्नांच्या रंगाची उधळण करून खऱ्या अर्थाने धुलीवंदन घडवून आणणाऱ्या आदर्श गुरूंचे व यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन अशा भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या. या सर्व खेळाडूंचे गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण बेडसकर, केंद्रप्रमुख बलशेटवार , केंद्रीय मुख्याध्यापक अशफाख, मुख्याध्यापक एस. एस.राठोड, गंगाधर वानोळे, भालचंद्र खुर्पे, जिजाराम खुडे, बी.डी. राठोड, नंदलाल भंडारी, नायबळ, धपाटे, पाचनकर, साळुंखे आदी शिक्षकांनी केले.
काय आहे टेनिस-व्हॉलिबॉल टेनिस-व्हॉलिबॉल या खेळात टेनिस आणि व्हॉलिबॉल या दोन्ही खेळाचे कौशल्यपणास लावले जाते. या खेळाचे जनक पुण्यातील प्रा.डॉ.व्यंकटेश वांगवाड यांना मानले जाते. व्हॉलिबॉल व टेनिस या दोन्ही खेळांची आवड त्यांना होती. आपल्या विद्यार्थ्यांसमवेत विविध खेळांचा सराव करताना आपण टेनिस कोर्ट्सवर व्हॉलिबॉल खेळण्याचा प्रयोग करावा असा विचार त्यांच्या मनात आला. विद्यार्थ्यांबरोबर त्यांनी तसा प्रयोग करून पाहिला. पतियाळा येथील राष्ट्रीय क्रीडा प्रशिक्षण संस्थेत १९८६ मध्ये एका अभ्यासक्रमासाठी ते गेले असताना तेथे त्यांनी पुन्हा टेनिस व्हॉलिबॉलचा प्रयोग करून पाहिला. त्यानंतर १९९८ मध्ये वांगवाड यांनी शारीरिक शिक्षण प्राध्यापकांच्या राष्ट्रीय परिषदेत या खेळाचा माहितीपट दाखविला. तेथे आलेल्या सर्वानाच या संकल्पनेने मोहित केले. १९९९ मध्ये पहिली राष्ट्रीय स्पर्धा आयोजित करण्यात आली. २००३ मध्ये सबज्युनिअर व कुमार गटाच्या राष्ट्रीय स्पर्धानाही प्रारंभ झाला. आता शालेय राष्ट्रीय स्पर्धामध्येही त्याचा समावेश करण्यात आला आहे. आज हा खेळ देशाच्या कानाकोपऱ्यात पसरला आहे. महाराष्ट्राने या खेळात हुकमत गाजविली असली, तरी त्यांच्या मक्तेदारीला मध्य प्रदेश, गोवा, उत्तर प्रदेश आदी राज्यांनी शह देण्याचा प्रयत्न केला आहे. महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्य़ांमध्ये हा खेळ खेळला जात आहे.
असे आहेत खेळाचे नियमटेनिस व्हॉलिबॉलसाठी १६ बाय ८ मीटरचे आयताकृती क्रीडांगण वापरले जाते. त्यामध्ये आठ मीटरवर मध्यरेषेपासून दोन समान कोर्ट्स. टेनिसप्रमाणे दोन्ही बाजूस बेसलाइन व साइडलाइन्स असतात. जमिनीपासून नऊ मीटर अंतरावर नेट बांधलेले असते. चेंडूचे वजन साधारणपणे २४० ते २५० ग्रॅम असते. सहसा क्ले कोर्ट किंवा हार्ड कोर्ट मैदानाचा उपयोग केला जातो. प्रत्येक संघात किमान चार व जास्तीत जास्त सहा खेळाडू असतात. प्रत्येक सामन्यात एकेरी-दुहेरी व पुन्हा एकेरी अशा तीन लढती असतात. दोन खेळाडू एकेरीची लढत खेळतात तर अन्य दोन खेळाडू दुहेरीचा सामना खेळतात. तीन लढतींपैकी दोन लढती जिंकणारा संघ सामन्यातील विजयी संघ असतो. प्रत्येक लढतीत तीन गेम्स असतात. दोन गेम्स जिंकणारा खेळाडू विजयी जाहीर केला जातो. प्रत्येक गेम १५ गुणांचा असतो. गेम जिंकताना दोन गुणांचा फरक असणे आवश्यक आहे. टेनिस कोर्टप्रमाणे सव्र्हिस क्रॉसकोर्ट करावी लागते. सव्र्हिस करण्यासाठी बेसलाइनच्या बाहेर एक चौकोन आखलेला असतो. त्यामधूनच सव्र्हिस करावी लागते.