बीड : लोकसभा निवडणुकीत बीडचा निकाल धक्कादायक आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा महाविकास आघाडीचे बजरंग सोनवणे यांनी निसटता पराभव केला. गेवराई व केज मतदारसंघात मुंडे पिछाडीवर पडल्या. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सहाही आमदारांचे टेन्शन वाढले आहे.
जिल्ह्यात बीड, केज, माजलगाव, गेवराई, आष्टी आणि परळी असे सहा मतदारसंघ आहेत. यातील केजमध्ये नमिता मुंदडा तर गेवराईमध्ये ॲड. लक्ष्मण पवार हे भाजपचे आमदार आहेत. अजित पवार गटाचे परळीत धनंजय मुंडे, माजलगावात प्रकाश सोळंके आणि आष्टीत बाळासाहेब आजबे हे आमदार आहेत. विधान परिषदेवरही भाजपचे सुरेश धस आमदार आहेत. शरद पवार गटाकडे केवळ बीडचे संदीप क्षीरसागर हे एकमेव आमदार आहेत.
धनंजय मुंडे सोबत असतानाही...२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत धनंजय मुंडे हे बजरंग सोनवणे यांच्यासोबत होते. परंतु यावेळी महायुतीत असल्याने ते बहीण पंकजा मुंडे यांच्यासोबत होते. सोबतच दोन आमदारही होते. त्यामुळे पारडे जड समजले जात असताना पंकजा यांचा झालेला पराभव धक्कादायक आहे.
आता पंकजा यांचे पुढे काय?पंकजा यांना उमेदवारी मिळाल्याने डॉ. प्रीतम मुंडे यांचा पत्ता अगोदरच कट झाला होता. त्यांना विस्थापित होऊ देणार नाही, असा शब्द पंकजा यांनी दिला होता. परंतु, आता पंकजा यांचाच पराभव झाल्याने त्याच विस्थापित झाल्याची चर्चा आहे. आता त्यांची पुढची भूमिका काय असणार? याकडे लक्ष लागले आहे.
उमेदवारांना मतदारसंघनिहाय पडलेली मतेउमेदवार गेवराई माजलगाव बीड आष्टी केज परळी टपालीपंकजा मुंडे ९५,४०९ १५,६४८ ७७,६०५ १,४५,५५३ १,०९,३६० १,४१,७७४ २,०४८ बजरंग सोनवणे १,३४,५०५ १,०४,७१३ १,३९,९१७ १,१३,२९९ १,२३,१५८ ६६,९४० १,४१८
हा निकाल अनपेक्षित आहे. तरीही मी डळमळीत नाही. जेवढी मते मिळाली, त्यात आनंदी आहे. या विजयामुळे विरोधकांचा नक्कीच आत्मविश्वास वाढेल. याचे परिणाम विधानसभेत होतील. त्यामुळे सहज घेऊन चालणार नाही. महायुतीच्या नेत्यांना आता रणनीती आखावी लागेल आणि ते आखतील, असा विश्वास आहे. - पंकजा मुंडे, बीड