Dhananjay Munde Ajit Pawar: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या नेतृत्वाखाली जनसन्मान यात्रा काढली आहे. यात्रेच्या निमित्ताने अजित पवार महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. गुरुवारी (२९ ऑगस्ट) ही यात्रा बीड जिल्ह्यात होती. त्यावेळी धनंजय मुंडे यांनी अजित पवारांकडे उमेदवारी मागण्याबरोबर बीड जिल्ह्यातील चार विधानसभा जागांवर दावा केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी अजित पवारांसमोरच बीड जिल्ह्यातील चार जागांवर दावा केला. बीडमधील चार आमदार घड्याळ चिन्हावर निवडून आणणार, असे धनंजय मुंडे म्हणाले. यावेळी धनंजय मुंडेंनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावरही टीकास्त्र डागले.
धनंजय मुंडे अजित पवारांना काय म्हणाले?
धनंजय मुंडे म्हणाले, "दादा (अजित पवार) आज मी बीड जिल्ह्यातील मायबाप जनतेच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आज चार आहेत. चारही आमदार घड्याळाचे असतील. महायुतीचे सहा आमदार असतील."
बीड लोकसभा मतदारसंघात निवडणूक चर्चेचा विषय ठरली. त्याबद्दल मुंडे म्हणाले, "आम्ही लोकसभेची निवडणूक महायुती म्हणून लढलो. कशा प्रकारे झाली, हे महाराष्ट्राला नाही तर देशाला माहिती आहे. ज्या जात-पात-धर्मासाठी ही निवडणूक झाली, त्याचे कंपणच बीड होते. तरी सुद्धा फक्त ६ हजार मताधिक्याने महायुतीचा उमेदवार याठिकाणी हरला", असे भाष्य धनंजय मुंडे यांनी लोकसभा निवडणुकीबद्दल बोलताना केले.
अजित पवारांकडे धनंजय मुंडेंनी मागितली उमेदवारी
"आता येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत दादा (अजित पवार) महायुतीचे सहाचे सहा आमदार आणि यातील घड्याळाचे चार आमदार, हे तुमच्या पाठीमागे उभे करणे, माझ्यासहित... मला उमेदवारी दिली तर... माझ्यासहित घड्याळाचे चार आणि महायुतीचे दोन असे सहा आमदार आपल्या पाठीमागे उभे राहतील, ग्वाही देतो", असे धनंजय मुंडे म्हणाले.