पद्मशाली संघमतर्फे महर्षी मार्कंडेय ऋषी जयंती
बीड : येथील पद्मशाली समाजाचे आराध्य दैवत महर्षी मार्कंडेय भगवान यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सकाळी साईनाथ आरटवार यांच्या हस्ते सुभाष रोड डीपी रोडवरील मार्कंडेय शिव मंदिरात अभिषेक व पूजन करून अभिवादन करण्यात आले, तसेच यावेळी उपस्थित सर्व समाज बांधवांनी महर्षी मार्कंडेय यांच्या मूर्तीचे पूजन व आरती करून अभिवादन केले.
तालखेड येथे क्लबवर धाड, जुगाऱ्यांमध्ये डॉक्टर, शिक्षकाचा समावेश
माजलगाव : तालुक्यातील तालखेड येथील कैलास मोरे यांच्या शेतातील गोठ्यात तिरट नावाचा जुगार खेळताना माजलगाव ग्रामीण पोलिसांनी शनिवारी दुपारी धाड टाकून ५ आरोपींविरुद्ध कारवाई केली. त्यांच्याकडील १३ हजार रुपये रोख रक्कम हस्तगत केली. आरोपींमध्ये एक डॉक्टर व शिक्षकाचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे.
उर्दूच्या बालवाडीताईंना सहा वर्षांपासून मानधनच नाही
माजलगाव : अल्पसंख्याक समाजाला विशेष म्हणजे उर्दू भाषिक पाल्यांना राष्ट्रीय शैक्षणिक प्रवाहामध्ये सामावून घेण्यासाठी शासन मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत असताना दुसरीकडे मात्र जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणाचा नमुना समोर आला आहे. बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात असलेल्या ३३ उर्दू बालवाड्यांमध्ये काम करणाऱ्या ताईंना तब्बल सहा वर्षांपासून मानधनच देण्यात आले नसल्याचा प्रकार उघड झाला आहे. याबाबत सतत पाठपुरावा करूनदेखील प्राथमिक शिक्षण विभागाची उदासीनता दिसून येत असल्याने येत्या १ मार्च रोजी गटशिक्षणाधिकारी कार्यालयासमोर उर्दू ॲक्शन कमिटीच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे.
जय भवानी कारखान्यात ३ लाख मेट्रिक टन ऊस गाळप
गेवराई : गेवराई तालुक्यातील शेतकऱ्यांचा केंद्रबिंदू असलेल्या जय भवानी सहकारी साखर कारखान्याच्या २०२०-२१च्या दुसऱ्या टप्प्यातील चालू हंगामामध्ये १०४ दिवसांत ३ लाख मेट्रिक टन गाळप करून जिल्ह्यात सर्वाधिक सरासरी ९.५१ टक्के साखर उतारा मिळवत २,८२,६७५ क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. त्यामुळे यंदा जय भवानी कारखान्याने साखर उतारा व ऊस दरात जिल्ह्यात अव्वल स्थान निर्माण केले आहे.