परळी : देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक प्रभू वैद्यनाथाच्या नगरीत श्री वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने महाशिवरात्र ३ ते ७ मार्च दरम्यान यात्रा महोत्सवाचे आयोजन केले आहे. वैद्यनाथाच्या दर्शनासाठी शनिवारपासूनच राज्य व परराज्यातून भाविकांची रेलचेल सुरु झाली आहे. रविवारीही वैद्यनाथाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती.४ मार्च रोजी महाशिवरात्रीला वैद्यनाथ मंदिरात भाविकांना दर्शन घेणे सुलभ व्हावे म्हणून धर्म दर्शनमध्ये पुरु ष व महिलांच्या दोन स्वतंत्र व पासधारकांची स्वतंत्र रांग असेल. दर्शन पासची सोय केली आहे. ४ मार्च रोजी सायंकाळी ६ ते ८ च्या दरम्यान वैद्यनाथ देवस्थान ट्रस्ट तर्फे जिल्हाधिकारी बीड यांच्या हस्ते वैद्यनाथास रुद्राभिषेक करण्यात येणार आहे. त्यानंतर भाविकांना अभिषेकासाठी परवानगी देण्यात येणार आहे.परळी परिसरातील शिवभक्तांसाठी विनामूल्य पास लाईन दर्शनासाठी विशेष व्यवस्था केली आहे. ४ मार्च रोजी रात्री १० पासून ते रात्री १२ पर्यंत पासच्या रांगेतून विनामूल्य दर्शन घेता येईल. त्यासाठी आधार कार्ड, मतदान कार्ड किंवा ओळखीचा पुरावा दाखवावा लागेल. ५ मार्च रोजी यज्ञेश्वर महाराज सेलूकर यांच्या उपस्थितीत वैद्यनाथ मंदिराजवळील प्रांगणात श्री सुक्त हवन होणार आहे. तसेच सर्व शिवभक्तांना दर्शन मंडप येथे दुपारी १२ ते ४ दरम्यान महाप्रसादाची व्यवस्था केली आहे.६ मार्च रोजी श्री वैद्यनाथाची पालखी सवाद्य मिरवणुकीने निघेल. सायंकाळी देशमुखपारा भागात पं. जितेंद्र अभिषेकी यांचे शिष्य पं. हेमंत पेंडसे (पुणे) यांचा भक्तीगीत व अंभगवाणीचा कार्यक्रम होईल. अंबेवेस येथे रात्री ९ वाजता शोभेची दारू उडविण्यात येईल. ७ मार्च रोजी सकाळी १० ते ११ वैद्यनाथ मंदिरात मानाची बिदागी वाटपाचा कार्यक्रम होईल. महाशिवरात्र महोत्सवातील सर्व कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष तथा तहसीलदार डॉ.विपीन पाटील व सचिव राजेश देशमुख आणि विश्वस्त मंडळाने केले आहे.असा आहे पोलीस बंदोबस्तवैद्यनाथ मंदिरात २ उपविभागीय पोलिस अधिकारी, ६ पोलिस निरीक्षक, २६ पोलिस अधिकारी, २६० पोलीस कर्मचारी, ७० महिला पोलिस कर्मचारी, एस.आर.पी.ची एक प्लॅटुन, आर.सी.पी.चे एक प्लॅटुन, क्यु.आर.टी.चे दोन प्लॅटुन, १०० होमगार्ड असा बंदोबस्त असेल.बॉम्ब शोध व नाशक, दरोडा प्रतिबंधक, एलसीबी पथक तैनात असतील, अशी माहिती पो. नि. देविदास शेळके व पो. नि. बाळासाहेब पवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अजित बोºहाडे, उपविभागीय पोलिस अधिकारी सुरेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली यात्रा महोत्सवात कडक पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. वैद्यनाथ मंदिर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे मंदिराच्या वतीने लावण्यात आलेले आहेत.
परळीत आजपासून महाशिवरात्र यात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2019 12:25 AM
देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक प्रभू वैद्यनाथाच्या नगरीत श्री वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने महाशिवरात्र ३ ते ७ मार्च दरम्यान यात्रा महोत्सवाचे आयोजन केले आहे.
ठळक मुद्देवैद्यनाथ देवस्थान ट्रस्टचे आयोजन : वैद्यनाथाच्या दर्शनासाठी भाविकांची शनिवारपासून रेलचेल