- संजय खाकरेपरळी (बीड): तब्बल अकरा वर्षांनी शनीप्रदोष आणि महाशिवराञ असा दुर्मिळ योग जुळून आल्याने येथील वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिरात भाविकांची शुक्रवारी रात्रीपासूनच विक्रमी गर्दी पहायला मिळत आहे. महाशिवराञीच्या महापर्व काळात हजारो शिवभक्तांनी श्री प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले. राज्यासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा येथील हजारो भाविक परळीत मोठ्या प्रमाणात दाखल होत आहेत.
देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या येथील प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाच्या दर्शानासाठी भाविकांची अलोट गर्दी झाली आहे. आज महाशिवरात्र उत्सवामुळे परळी शहर गजबजले आहे. वैद्यनाथ मंदीरात रात्री 12 पासून भाविकांच्या रांगा लागल्या असून दर्शनासाठी भाविकांची गर्दी उसळली आहे. महाशिवराञीचा महापर्वकाळ असून त्यात तब्बल अकरा वर्षांनी प्रदोष आणि महाशिवराञ असा दुर्मिळ योग यावर्षी जुळून आला आहे. त्यामुळे भाविकांची विक्रमी गर्दी झाली आहे श्री जगमित्रांच्या समाधी स्थळाचे, विठ्ठल- रुक्माईचे देखील हजारो भाविकांनी दर्शन घेतले.
महाशिवरात्रीनिमित्त दर्शन घेण्यासाठी श्री वैद्यनाथ मंदिरात दर्शनासाठी महिला व पुरुष अशा दोन वेगळ्या रांगा आहेत. तसेच पास धारकांची स्वतंत्र रांग आहे. ही रांग वैद्यनाथ मंदिर पासून नगरपरिषद कार्यालयापर्यंत गेली होती. महाशिवरात्रीच्या अनुषंगाने श्री वैद्यनाथ मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली असून रंगरंगोटी करण्यात आली आहे व पायऱ्यावर बॅरिकेटची सोय करण्यात येऊन मंडप उभारण्यात आला आहे. वैद्यनाथ मंदिराची फुलांनी सजावट केल्याचे पाहून भाविकांनी समाधान व्यक्त केले. फुलांनी सजविलेले वैद्यनाथ नाव सेल्फी पॉईंट झाला आहे.
दरम्यान, हर हर महादेव चा जयघोष करीत शुक्रवारी मध्यरात्र ते आज सकाळी 11 वाजेपर्यंत जवळपास 2 लाखांच्यावर भाविकांनी श्री वैद्यनाथाचे दर्शन घेतले, अशी माहिती श्री वैजनाथ मंदिराचे सचिव राजेश देशमुख यांनी दिली. माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी रात्री बारा वाजता श्री वैद्यनाथाचे दर्शन घेतले. तर भाजपा राष्ट्रीय सचिव माजीमंत्री पंकजा मुंडे यांनी सकाळी 7.30 वाजता दर्शन घेतले. तसेच अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी सपत्नीक श्रीवैद्यनाथाचे दर्शन घेतले.
वैद्यनाथ मंदिरात पास रांगेत पाच तास थांबून दर्शन घेतले- समाधान वाटले- भागन्ना जमादार ,धानुर, गाणगापूर कर्नाटक
महाशिवरात्र महापर्वकाळ असल्याने महाशिवरात्रीचे प्रभु वैद्यनाथाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती या गर्दीत आपण रांगेत थांबून दर्शन घेतले आनंद वाटला- छाया चव्हाण, परळी