बीड : भाजप सरकारने मिळवून दिलेले आरक्षण महाविकास आघाडी सरकारला टिकवून ठेवता आलेले नाही. हे सरकार मराठा आरक्षणसंदर्भात न्यायालयात भक्कमपणे बाजू न मांडून एक प्रकारे छळच करत असल्याचा आरोप पुणे येथील मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रघुनाथ चित्रे यांनी पत्रकार परिषदेत केला. पुणे ते साष्टंपिंपळगाव मराठा संघर्ष यात्रा काढण्यात आली असून गुरूवारी बीडमध्ये यात्रेचे स्वागत करण्यात आले.
क्रांती मोर्चाच्या वतीने आयोजीत पत्रकार परिषदेस बीड येथील समन्वयक भानुदास जाधव, राजेंद्र मस्के, अशोक हिंगे, गोरख शिंदे, विनोद सावंत, अशोक सुखवसे, यांची यावेळी उपस्थिती होती. पुढे चित्रे म्हणाले, मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने महाराष्ट्रात ५८ मूकमोर्चे अत्यत शिस्तीने संयमाने व शांततेने निघाले. मराठ्यांनी जगामध्ये आदर्श निर्माण केला आहे. यापुढे देखील मराठा समाजास संयम राखूनच लढाई करावी लागणार आहे. मराठा क्रांती मोर्चा पुढेही शांततेच्या मार्गानेच जाणार आहे. साष्ठपिंपळगाव येथे मराठा आरक्षण आणि इतर मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी आणि राज्यातील तरूणांचे नैराश घालविण्यासाठी संघर्ष यात्रा काढण्यात आलेली आहे. आम्ही पुणे येथून बीड आणि मालेगाव येथील आंदोलकांना भेट देवून साष्टंपिंपळगावला जाणार आहोत.
केवळ आरक्षणच नाही तर विद्यार्थ्यांचे प्रवेश आणि कोरोनाच्या आधीच्या काळात झालेल्या नोकर भरतीत निवड झालेल्या मराठा तरूणांना अद्याप नियुक्ती दिलेली नाही. तसे पाहिले तर त्यावेळीच नियुक्ती देणे आवश्यक होते, परंतु ते जाणून बुजून त्रास देण्याचा प्रकार आहे. यामुळे मराठा समाजाच्या मनात संतोष पसरत आहे. सरकारमध्ये असलेले मंत्री अशोक चव्हाण यांच्यासोबत अनेक बैठका झाल्या पंरतु ते टोलवाटोलवी करत आहेत. वकील आणि सरकारमध्ये कसलाही समन्वय दिसून येत नाही. यामुळे सरकारने आता खंबीरपणे बाजु मांडण्यासाठी प्रयत्न केला नाही तर याचे परिणाम भोगण्यास सरकारने तयार रहावे, असेही चित्रे म्हणाले.