- नितीन कांबळे कडा ( बीड) : कसलीही पूर्व सूचना न देता महावितरणने थकीत वीजबिलापोटी टाकळी अमिया येथील सबस्टेशनवरून पाच गावांचा वीजपुरवठा खंडीत केला होता. याविरोधात संतप्त शेतकऱ्यांनी आज सकाळी महावितरणच्या अधिकाऱ्यांना घेराव घालत जाब विचारला. यामुळे नरमलेल्या महावितरणाने आज दुपारनंतर तत्काळ वीज पुरवठा सुरळीत केला.
आष्टी तालुक्यातील टाकळी अमिया येथील ३३ के.व्ही.सबस्टेशनवरून रूईनालकोल, सराटेवडगांव, नांदा, टाकळी अमिया, चोभानिमगाव या गावांना वीजपुरवठा होतो. थकीत बिलापोटी महावितरणाने या गावातील वीज पुरवठा चार ते पाच दिवसांपासून खंडीत केला. सध्या पेरणीचे दिवस आहेत. तर काही ठिकाणी पेरणी झालेली आहे. यामुळे गहु, ज्वारी, कांदा, हरभरा आदी रब्बी पिके धोक्यात आली. यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी आज सकाळी टाकळी अमिया येथील ३३ के.व्ही.सबस्टेशन गाठले. अधिकाऱ्यांना घेराव घालत शेतकऱ्यांनी जाब विचारला.
अचानक झालेल्या या आंदोलनामुळे महावितरण नरमले असून दुपारनंतर वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. आंदोलनात ज्ञानेश्वर चौधरी, प्रा. राम बोडखे, डाॅ.शिवाजी शेंडगे, अमोल शितोळे, पिनु चौधरी, सावता ससाणे, मधुकर गिर्हे, अशोक चौधरी, शिवाजी भवर, अशोक एकशिंगे, श्रीरंग चौधरी, तात्यासाहेब नालकोल, आजिनाथ नालकोल, पांडुरंग धोंडे यांच्यासह अनेक शेतकरी सहभागी होते. वीजपुरवठा सुरळीत झाल्याने शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. आधीच खरीप हंगाम अतिवृष्टीने हातच गेला आहे. आता रब्बी हंगामाकडे शेतकरी आस लावून आहे.