लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : कोरोनाचा फटका सर्वांत जास्त सामान्यांना बसला आहे. यात कामगारांसह मोलकरणींचाही समावेश आहे. कोरोनाच्या भीतीने आता लोकांनी त्यांच्यासाठी दरवाजे बंद केले आहेत. त्यामुळे घरात येणारा पैसा बंद झाला आहे. आता हाताला काम नसल्याने कुटुंबाचा गाडा चालवायचा कसा, असा प्रश्न या मोलकरणींसमोर आहे.
बीड शहरात साधारण दोन हजार मोलकरणी रोज धुणी, भांडी, घरकामासाठी बाहेर पडतात. काही महिला कार्यालयांत जाऊन स्वच्छता करतात. परंतु कोरोना संसर्गाची भीती वाढत असल्याने लोक काळजी म्हणून स्वत:ची कामे स्वत:च करत आहेत. त्यामुळे त्यांच्या हातचे काम गेले असून, आज त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
एका घरातून ५०० ते १५०० रुपये
एका घरात केवळ भांडी स्वच्छ करायला एका मोलकरणीला ५०० रुपये दिले जातात. तसेच भांडी, फरशी साफ करणे, कपडे धुणे, आदी कामे करावयाची असल्यास एका घरातून महिन्याकाठी दीड हजार रुपये दिले जात असल्याचे सांगण्यात आले. कामाच्या तुलनेत ही रक्कम कमी असल्याचे मोलकरणी सांगतात.
कुटुंबाचे पोट कसे भरणार?
रोज एकाच्या घरी जाऊन धुणी, भांडी करतो. परंतु, आमची कोठेच नोंद नाही. कधी याबद्दल माहितीच नव्हती. आता आमची नोंद नसल्याने शासनाच्या मदतीपासून वंचित राहू, याची भीती आहे. त्यामुळे शासनाने आम्हाला मदत करावी. सध्या खूप अडचणी आहेत.
मनीषा पांढरे, बीड
अगोदर हाताला काम होते. परंतु, लॉकडाऊनमुळे पाचऐवजी केवळ दोनच घरचे काम करते. यातून थोडेफार पैसे मिळतात. तेवढ्यात कुटुंब चालविताना अनेक अडचणी येत आहेत.
सोनाबाई काळे, बीड