माजलगाव (बीड ) : औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यात तरुणाने घेतलेल्या जलसमाधी नंतर मराठा क्रांती मोर्चाने पुकारलेल्या बंद च्या पार्श्वभूमीवर माजलगाव शहरात आज कडकडीत बंद पाळण्यात आला.
सकाळी 11 वाजण्याच्या दरम्यान येथील शिवाजी चौकात हजारो आंदोलक जमा झाले. प्रथमत: कायगाव येथे जलसमाधी घेऊन समाजासाठी बलिदान देणाऱ्या काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर माजलगाव शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी येऊन मराठा समाजाच्या आरक्षणासह इतर मागण्या त्वरित पूर्ण करण्यात याव्यात तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा असे निवेदन तहसीलदार एन जी. जम्पलवाड, पोलीस निरीक्षक संजय महाजन यांच्याकडे देण्यात आले. या दरम्यान, बंदच्या पार्श्वभूमीवर माजलगाव शहर सकाळपासूनच बंद होते. शहरातील व्यापाऱ्यांसह सर्वच घटकांनी बंदमध्ये सामील होऊन उत्स्फूर्त पाठिंबा दिला.