राज्य परिवहन महामंडळाच्या येथील आगारातून माजलगाव-बारामती बससेवा सुरू करण्यात आली. सोमवारी या सेवेचा शुभारंभ करण्यात आला.
लॉकडाऊननंतर ७ जूनपासून परिवहन महामंडळाच्या केवळ शहरी भागातील बससेवा सुरू ठेवण्यात आली आहे. कोरोना महामारी आटोक्यात आली असून आता प्रवाशांची बसमधून प्रवास करण्याची मानसिकता झाल्याने बसचे दररोजचे उत्पन्न वाढत आहे. आणखी उत्पन्न वाढीसाठी येथील आगारप्रमुख दत्तात्रय काळम हे प्रयत्नशील आहेत. माजलगाव आगारातून लांब पल्ल्याच्या बस सुरू कराव्यात, अशी मागणी होती. त्यास अनुसरून माजलगाव-बारामती बस सुरू करण्यात आली. सोमवारी सकाळी आगारप्रमुख दत्तात्रय काळम यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक निरीक्षक अ.दि. दौड, लिंबगावकर, जिंकलवाड, शैलेश जोशी, वाहक बालासाहेब भोजने, तसेच न.प. माजी सभापती सुनील पुरबुज, बसचे वाहक महादेव तंबुड, चालक एस.बी. घडसे यांच्या उपस्थितीत ही बस सोडण्यात आली. ही बस माजलगाव आगारातून दररोज सकाळी साडेनऊ वाजता सुटेल. धारूर, केज, येरमाळा, बार्शी, कुर्डूवाडी, टेंभुर्णी, इंदापूर, निमगाव केतकीमार्गे बारामती येथे सायंकाळी पाच वाजता पोहोचेल. दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजता बारामती येथून बस सुटेल व दुपारी ३ वाजता माजलगाव येथे पोहोचणार आहे. ही बस सुरू केल्याने याचा प्रवाशांना फायदा होणार असून जेजुरी, मोरगाव, शिखर शिंगणापूर जाणाऱ्या भाविकांची तसेच बारामती परिसरात असलेल्या साखर कारखान्यावर तसेच अन्य प्रकल्पांवर कामासाठी जाणाऱ्या कामगारांची सोय होणार आहे. या बससेवेचा प्रवाशांनी लाभ घेण्याचे आवाहन आगारप्रमुख काळम यांनी केले आहे.