धारूर तालुक्यातील आंबेवडगाव येथील रहिवासी असलेल्या नागरिकाला तलावात घर गेलेले असताना व त्याचा २५ वर्षापासून मावेजा न दिल्यामुळे येथील उपविभागीय अधिकारी यांची गाडी जप्त करण्याचे आदेश माजलगाव न्यायालयाने शुक्रवारी दिले आहेत.
धारूर तालुक्यातील आंबेवडगाव येथील रहिवासी असलेले यशवंत केरबा घोळवे ( वय ८० ) यांचे घर उपळी तलावात गेले होते. यामध्ये संबंधित व्यक्तीस शासनाकडून कमी मावेजा मिळाल्यामुळे त्यांनी १९९९ साली माजलगाव न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर न्यायालयाने अनेकवेळा संबंधित व्यक्तीस २ लाख ६० रूपये मावेजा देण्याचे आदेश दिले होते.
त्यानंतर अनेक उपविभागीय अधिकारी बदलले व न्यायालयाने संबंधित व्यक्तीस मावेजा न दिल्यामुळे येथील दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर एस.डी. घनवट यांनी ३ जानेवारी रोजी विभागीय अधिकारी यांची गाडी जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. यशवंत घोळवे यांच्याकडून अँड बाबुराव तिडके यांनी काम पाहिले.
चार वाजल्यापासून प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी वकील उपयोगी कार्यालयात पोहोचले होते. उपविभागीय अधिकारी यांनी यशवंत घोळवे यांना मावेजापोटी चेक न दिल्यास गाडी घेऊन जाण्यात येईल अशी माहिती अँड तिडके यांनी दिली. याबाबत येथील उपविभागीय अधिकारी नीलम बाफना यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता यांचा संपर्क होऊ शकला नाही.