माजलगाव : तालुक्यात माजलगाव धरण क्षेत्रात जोरदार पाऊस पडत असल्याने रविवारी सकाळपासून धरणात पाण्याची मोठी आवक सुरू झाली. त्यामुळे दुसऱ्यांदा सांडस चिंचोलीचा संपर्क तुटला असून अनेक गावांमध्ये पाणी शिरले आहे. दरम्यान रविवारी सकाळपासून धरणाचे ११ दरवाजे दीड मीटरने उघडण्यात आले. या दरवाजांद्वारे ६२ हजार ५१७ क्युसेक पाणी सिंदफणा नदीपात्रात सोडण्यात आले. यामुळे तालुक्यातील सांडस चिंचोलीचा सकाळपासून संपर्क तुटला असून गावात जाणाऱ्या फुलावर १० फुटांपेक्षा जास्त पाणी होते. तसेच गोविंदपूर, डेपेगाव व लुखेगावात पाणी शिरले आहे. यावर प्रशासनाचे लक्ष असल्याचे प्रभारी तहसीलदार अशोक भंडारे यांनी सांगितले.
------
अनेक गावच्या नागरिकांच्या उडाली झोप
मागील तीन आठवड्यांपासून माजलगाव धरणातून सिंदफणा नदी पात्रात पाण्याचा मोठा विसर्ग सुरू आहे. यामुळे सांडस चिंचोलीचा दुसऱ्यांदा संपर्क तुटला आहे आणि गावात पाणी शिरले आहे. आता पैठणचे धरणदेखील भरत आल्याने या धरणातून केव्हाही पाणी सुटू शकते. यामुळे सिंदफणा व गोदावरी नदीपात्र शेजारच्या २२ गावांतील नागरिकांची झोप उडाली आहे.
माजलगाव धरणातून नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर पैठणचे धरणदेखील लवकरच भरण्याची शक्यता निर्माण झाल्याने सिंदफणा नदीपात्रात लगतच्या गावासह गोदावरी नदीपात्राकडेच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाच्या वतीने दिला आहे.
-अशोक भंडारे, प्रभारी तहसीलदार.
260921\purusttam karva_img-20210926-wa0040_14.jpg~260921\img_20210924_161852_14.jpg