- पुरूषोत्तम करवामाजलगाव (बीड): यावर्षी पाहिजे तसा पाऊस नसल्यामुळे माजलगाव धरणाची पाणी पातळी अत्यंत धीम्या गतीने वाढू लागली आहे. पावसाळा सुरू होऊन दोन महिने उलटले असताना देखील अद्याप धरण निम्याने रिकामेच आहे. मागील तीन-चार वर्षात हे धरण परतीच्या पावसावरच पूर्ण क्षमतेने भरले होते. आता जेवढा पाण्याचा साठा आहे एवढे पाणी वर्षभर पुरू शकते.
गेल्या वर्षी मान्सून सुरू होण्यापूर्वीच अवकाळी पावसाने 2 जून रोजीच धरणाच्या पाण्यात 2 टक्के वाढ झाली होती.मध्यतरी कमी पाऊस झाल्याने हे धरण भरेल की नाही असे वाटत असतांना परतीच्या पावसाने हे धरण पूर्ण क्षमतेने भरले होते. त्यामुळे जवळपास दीड महिना धरणातून पाणी सिंदफना नदी पात्रात सोडण्यात आले होते. यामुळे कडक उन्हाळ्यात देखील तालुक्यात कोठेही टँकर सुरू करण्याची गरज पडली नव्हती.9 जून रोजी माजलगाव धरणाची पाणी पातळी 428.20 मीटर होती.यावेळी धरणातील एकुन पाणीसाठा 229 दलघमी होता तर 87 दलघमी ऐवढा जिवंत पाणीसाठा उपलब्ध होता.त्यामुळे पाण्याची टक्केवारी ही 27.88 ऐवढी होती.
माजलगाव तालुका व धरण परिसरात मागील दोन महिन्यात पाहिजे तसा पाऊस झाला नाही. पावसाळा सुरू होण्यापूर्वी माजलगाव धरणात 28 टक्के पाणीसाठा होता. पावसाळा सुरू होऊन दोन महिने उलटले असताना व उजव्या कालव्याद्वारे नाथसागर धरणातून मागील 15-20 दिवसांपासून पाणी सोडण्यात असतांना देखील माजलगाव धरणात केवळ 22 टक्केच पाणीसाठयात वाढ झाली. पैठणचे नाथ सागर धरण भरण्यापूर्वीच हे धरण भरून वाहत असते परंतु पैठणच्या धरणाचे पाणी अनेक दिवस गोदावरी पात्रात सोडलेले असताना देखील माजलगाव धरणात अत्यल्प पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.
सोमवारी सकाळी माजलगाव धरणाची पाणी पातळी 429.52 मीटर झाली त्यामुळे एकूण पाणीसाठा 298.20 दलघमी ऐवढा झाला आहे , तर धरणात जिवंत पाणीसाठा 156.20 दलघमी एवढा झाला आहे.यामुळे हे धरण केवळ 50.06 टक्के भरले असल्याची माहिती धरणाचे कनिष्ठ अभियंता बी. आर. शेख यांनी दिली.