माजलगाव : दुष्काळाच्या झळा एप्रिल महिन्यात मोठ्या प्रमाणात जाणवत आहेत. माजलगाव धरणाच्या पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होत असल्याने पाणीपातळीत दिवसेंदिवस घट होत आहे. शहरवासियांना पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीपर्यंत पाणी पोहचत नसल्याने पुढील काळात नगरपालिकेला पाणीपुरवठा करण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे.माजलगाव शहर व ११ खेड्यांना माजलगाव धरणातून पाणीपुरवठा करण्यात येतो. मागील चार ते पाच वर्षांपासून पावसाचे प्रमाण घटत असल्याने धरण भरणे अवघड झाले आहे. गेल्यावर्षी पावसाळ्यात हे धरण केवळ मृत साठ्यातून बाहेर आले होते. त्यानंतर पाऊस न पडल्याने ऐन पावसाळ्यातच धरण परिक्षेत्रातील शेतकऱ्यांनी शेतीसाठी पाणी वापरल्याने येथील पातळीत घट झाली होती. पावसाळ्यानंतर शासनाने या धरणाचे पाणी पिण्यासाठी राखीव ठेवले होते. परंतु बाष्पीभवन व शेतीसाठी बेसुमार उपसा झाल्याने पाणी पातळीत कमालीची घट झाली.सध्या दुष्काळाच्या झळा वाढल्याने पातळी दररोज खालावत चालली आहे. याचा फटका शहरवासियांसह अनेक गावांना बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. धरणात माजलगाव शहराला पाणीपुरवठा करणारी विहीर असून याची पाणी पातळी खालावल्याने टाकी भरण्यास दुप्पट वेळ लागत आहे. यामुळे नगर पालिका प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. सध्या नगरपालिकेने धरणातून बांध खोदून विहिरीत पाणी घेतले जात आहे. मात्र, पातळी दिवसेंदिवस घटत असल्याने हे पाणी बांधाद्वारे किती दिवस पुरणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. अद्याप पावसाळा सुरु होण्यास दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ लागत असल्याने पातळी किती खालावते यावर अनेक गावच्या पाण्याचा प्रश्न अवलंबून आहे.माजलगाव धरण १८ टक्क्यींनी कमीमाजलगाव धरण १०० टक्के भरण्यासाठी ४३१.८० मीटर एवढा पाणीसाठा आवश्यक असतो.९ एप्रिल रोजी धरणाची पाणी पातळी ४२४.०९ मीटर एवढी झाली आहे. जवळपास ८ मीटरने पातळी कमी आहे. सध्या धरणाची टक्केवारी (- १८ टक्के) असून धरणामध्ये ८७.८० दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे.पुढील अडीच महीन्यात पिण्याचे पाणी व बाष्पीभवन वगळता ३० जूनपर्यंत ५० दलघमी पाणी शिल्लक राहण्याची शक्यता धरणाचे शाखा अभियंता बी. आर. शेख यांनी व्यक्त केली आहे.सद्य परिस्थिती पाहता पाणीटंचाईची स्थिती आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.
माजलगाव धरण पातळी ८ मीटरने खालावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2019 11:44 PM