माजलगाव : नगराध्यक्ष सहाल चाऊस यांनी वैद्यकीय उपचारासाठी तात्पुरता जामीन देण्याची मागणी जिल्हा सत्र न्यायालयासमोर केली होती. यावर आज दि. ३ शुक्रवारी सुनावणी घेऊन सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस. पी. देशमुख यांनी त्यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. तिसऱ्यांदा जामीन फेटाळल्याने चाऊस यांच्या अडचणीती आणखीनच भर पडली आहे.
माजलगाव नगर पालिकेतील १४व्या वित्त आयोगासह विविध विकास कामासाठी आलेल्या निधीतून ५ कोटी ५७ लाख रुपयाचा अपहार झाल्याप्रकरणी डिसेंबर २०१९ मध्ये आठ दिवसात दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते. यात तीन मुख्याधिकाऱ्यासह अभियंता, लेखापाल अशा एकूण सात जनावर विविध कलमानुसार गुन्हे दाखल करण्यात आले होते. ता. चार मार्च रोजी नगराध्यक्ष सहाल चाऊस यांच्यासह मुख्याधिकारी हरीकल्याण येलगट्टे, लेखापाल अशोक कुलकर्णी यांना आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती.
त्यानंतर ता. ११ मार्च पर्यंत न्यायालयाने अंतरिम जमीन दिला होता. पुन्हा न्यायालयाने हा जमीन रद्द करून सहाल चाऊस यांना १४ दिवसाची न्यायालयांनी कोठडी सुनावण्यात आली. न्यायालयीन कोठडीत असताना यापूर्वी दोनदा चाऊस यांच्यातर्फे दोन वेळा न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला असता न्यायालयाने दोनदा तो फेटाळला.
चाऊस यांना हृदयाचा आजार असून त्यांची बायपास शस्त्रक्रिया झालेली आहे. न्यायालयीन कोठडीत असताना त्यांना पुन्हा हृदयाचा त्रास होत असून पुढील उपचार औरंगाबाद येथे घ्यावा लागत असल्याने वैद्यकीय उपचार घेण्यासाठी तात्पुरता जामीन देण्याची मागणी दोन दिवसापूर्वी न्यायालयाकडे केली होती. यावर शुक्रवारी (ता. तीन) सुनावणी घेऊन न्यायाधीश एस. पी. देशमुख यांनी चाऊस यांचा जामीन अर्ज तिसऱ्यांदा फेटाळला. सरकारपक्षातर्फे सहायक अभिवक्ता ऍड. रणजित वाघमारे यांनी काम पहिले. सहाल चाऊस यांचा तिसऱ्यांदा जामीन अर्ज फेटाळल्याने त्यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.