माजलगाव : येथील नगर परिषदेत अपहार प्रकरणी अंतरिम जामीनवर असलेले नगराध्यक्ष सहाल चाऊस हे प्रथमदर्शनी या भ्रष्टाचार प्रकरणी सहभाग दिसून येत असतांनाही फिर्यादीत आरोपी न करता, तपासात आरोपी करण्यात आले. तसेच निविदा प्रक्रिया करतांना ई टेंडरींग पद्धत अवलंबविली नाही असा ठपका ठेवत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती.पी.ए.वाघमारे यांनी अंतरिम जामीन रद्द करत नगराध्यक्ष चाऊस व लेखापाल अशोक कुलकर्णी यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली तर मुख्याधिकारी हरीकल्याण येलगट्टे याची जामीनीवर सुटका केली आहे.
माजलगाव नगर परिषदेत कोट्यवधी रुपयांचा अपहार प्रकरणी तीन मुख्याधिकारी व इतर चार जणांवर दोन वेग-वेगळे गुन्हे दाखल आहेत. याच प्रकरणात नगराध्यक्ष सहाल बीन आमेर चाऊस याना दि.4 मार्च रोजी नगर परिषद कार्यालयात पोलिसांनी अटक केली होती. तर मुख्याधिकारी हरीकल्याण येलगट्टे, लेखापाल अशोक कुलकर्णी वांगीकर हे दोघे स्वतः पोलिसांकडे हजर झाले होते. या तिघांनाही येथील न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर चाऊस व येलगट्टे यांची दि.11 पर्यंत अंतरिम जामीन मंजूर करण्यात आली.
बुधवारी (दि.11 ) पुन्हा न्यायालयासमोर हजर केले असता प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती.पी.ए.वाघमारे यानी नगराध्यक्ष सहाल चाऊस यांनी अध्यक्ष या नात्याने नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असतांना ती पाळली नाही. असा ठपका ठेवत 2012-2017 हा कालावधी नगराध्यक्ष चाऊस यांच्या कार्यकाळात येतो. यात प्रथमदर्शनी नगराध्यक्ष चाऊस व लेखापाल अशोक कुलकर्णी याचा सहभाग दिसून येतो. गुन्ह्याचे गांभिर्य लक्षात घेता अशा आरोपींना जामिन देणे योग्य नाही, असे म्हणत जामीन फेटाळत नगराध्यक्ष चाऊस व लेखापाल कुलकर्णीस 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.यावेळी सहाय्यक सरकारी वकिल म्हणून अॅड.प्रताप .माने यानी काम पाहिले. तर तपासी अधिकारी म्हणून आष्टी येथील पोलीस उपअधिक्षक विजय लगारे यानी महत्वाची भुमिका निभावली.