- पुरुषोत्तम करवा
लोकमत न्यूज नेटवर्क
माजलगाव : तालुक्यातील खरीप पिकांसाठी २१ हजार मेट्रिक टन खते लागणार असल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तवला आहे. यावर्षी खतांच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने शेतकऱ्यांच्या खिशाला मोठी झळ बसणार आहे. यामुळे शेतकरी चिंतेचे वातावरण आहे.
यावर्षी वेळेवर पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवल्याने माजलगाव तालुक्यात यावर्षी जवळपास ८० हजार हेक्टरवर खरिपाचा पेरा अपेक्षित आहे. यासाठी रासायनिक खते किती प्रमाणात लागणार, यासाठीचे सर्व नियोजन कृषी विभागाने केलेले आहे. यावर्षी सर्व प्रकारचे रासायनिक खते मिळून २१ हजार २०० मेट्रिक टन खते लागण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यापैकी २ हजार मेट्रिक टन खते एप्रिल महिन्यातच बाजारात उपलब्ध झालेली आहेत. त्यात युरिया खत १ हजार ५०० मेट्रिक टन, तर इतर प्रकारची खते मिळून ३ हजार मेट्रिक टन खते बाजारात शिल्लक आहेत.
खतांच्या दरात दररोज बदल
काही महिन्यांपासून पेट्रोलचे दरही दररोज बदलत आहेत. त्याचप्रमाणे यावर्षी खतांचे दरदेखील बदलणार असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे.
...
खताचे वाढलेले दर असे...
महाधन खताचे दर २ हजार ६०० रुपयांवरून ४ हजार रुपये क्विंटल, डीएपी खताचे दर २ हजार ५०० वरून ३ हजार रुपये क्विंटल, तर १०:२६:२६ खते २ हजार ४५० वरून ३ हजार रुपये क्विंटलपर्यंत मिळत आहेत.
....
सध्या खतांच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. काही व्यापाऱ्यांनी खतांचे साठे करून ठेवले आहेत. ते नव्या दरात विकण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे शेतकऱ्यांनी सर्व प्रकारच्या खतांच्या बॅगा घेताना त्यावरील एमआरपी बघूनच पैसे द्यावेत, जर एखादा व्यापारी जुनी खताची बॅग देऊन जास्त पैसे घेत असेल तर शेतकऱ्यांनी खते ताब्यात घेतांनाचा फोटो घेऊन ठेवावा आणि याची तक्रार कृषी विभागाकडे करावी. ज्यामुळे कारवाई करणे सोपे जाईल.
-सिध्देश्वर हजारे, कृषी अधिकारी, पंचायत समिती, माजलगाव