माजलगाव : भ्रष्टाचार प्रकरणात येथील नगराध्यक्ष सहाल चाऊस यांना अटक झाल्यानंतर ९० दिवस या पदावर गैरहजर राहिल्यामुळे त्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी या पदावरून बडतर्फ केले होते. यानंतर नगराध्यक्ष पदाचा पदभार उपाध्यक्षाकडे दिल्यानंतर आता पुढील १० महिन्यांसाठी नगरसेवकातुन लवकरच निवड होणार असल्याचे वृत्त असल्याने नगरसेवकांची या पदासाठी रस्सीखेच लागणार आहे.
नगराध्यक्ष सहाल चाऊस यांच्या कार्यकाळात झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणात तीन मुख्याधिका-यांसह ,तीन लेखापाल व नगराध्यक्षांवर दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते. यानंतर ४ मार्च रोजी सहाल चाऊस यांना अटक झाल्यानंतर ते या पदावर ९० दिवस गैरहजर राहिल्याने व १९ नगरसेवकांनी त्यांच्यावर जिल्हाधिकारी यांना भेटुन अविश्वास दाखवल्याने चाऊस यांना या पदावरून बडतर्फ करण्यात आले होते. त्यानंतर दोन महिन्यांपूर्वी उपाध्यक्षाकडे नगराध्यक्ष पदाचा पदभार देण्यात आला होता.
चाऊस हे जनतेतून निवडून आले असले तरी या महाराष्ट्र सरकारने यापुढील नगराध्यक्ष हा नगरसेवकातूनच निवडणार असल्याचा निर्णय घेतला होता. यामुळे नगराध्यक्ष पदाची निवडणूक न घेता आता नगरसेवकातुनच नगराध्यक्ष पदाची निवड करावी लागणार आहे. यामुळे येथील नगराध्यक्षांच्या रिक्त पदावर एखाद्या नगरसेवकांची निवड करण्यात येऊ शकते.
या बाबत येथील मुख्याधिकारी यांनी प्रस्ताव जिल्हाधिकारी यांना पाठवला असून तो प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी नगरविकास खात्याकडे पाठवला असून , नगर विकास खात्याने या बाबत निवडणूक आयोगाला कळवल्याचे वृत्त असून लवकरच नवीन नगराध्यक्षांची निवड होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या राष्ट्रवादी काँग्रेस,भाजप, शिवसेना व आघाडीच्या नगरसेवकांमध्ये नगरपालिका बरखास्त करण्याच्या धमकीमुळे चांगलीच घबराट निर्माण झाली होती. ही बरखास्ती टाळण्यासाठी नगरसेवकांनी आपला एजंडा व पक्षाचा आदेश झुगारत आ.प्रकाश सोळंके यांच्यापुढे नांगी टाकल्याने सध्या सध्या या नगरपालिकेत विरोधी नगरसेवक आहे की नाही, अशी अवस्था झाली असुन ते ठरवतील तोच नगराध्यक्ष पदावर विराजमान होऊ शकतो. यामुळे नगरसेवकांमध्ये या पदाला घेऊन हालचाली सुरू झाल्या आहेत.
असे आहे पक्षीय बलाबलमाजलगाव नगरपालिकेत २३ नगरसेवक असून त्यात राष्ट्रवादी काँग्रेस ७, भाजपचे ५, शिवसेनाचे २, एमआयएमचा १ व आघाडीचे ८ नगरसेवक निवडून आले होते. यामधून नगराध्यक्षपदासाठी नगरसेवकांमधून निवड होणार असून, याकडे लक्ष लागले आहे.