माजलगाव : येथील चिंचगव्हाण येथील जलशुद्धीकरण केंद्राचा वीजपुरवठा गेल्या अनेक दिवसांपासून वारंवार खंडित होत आहे. याचा परिणाम शहराच्या पाणीपुरवठ्यावर होत आहे. यामुळे सध्या माजलगावकरांना दहा-दहा दिवस पाणी मिळत नाही. अनेक भागातील नागरिकांवर पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे.
माजलगाव धरणाजवळ माजलगाव शहर व अकरा खेड्यांना पाणीपुरवठा करण्यासाठी जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आले आहे. या केंद्राच्या बाजूलाच असलेल्या १३२ के.व्ही. केंद्रातून वीजपुरवठा करण्यात येतो. परंतु मागील आठ दिवसांपासून या ठिकाणी वारंवार काही ना काही बिघाड होत आहे. त्यातच विजेचा लपंडाव सुरू आहे. या लपंडावामुळे येथील जलशुद्धीकरण केंद्रावरील पाण्याच्या मोटारी वारंवार बंद होत आहेत. पाण्याची टाकी भरायला वेळ लागत आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने पाण्याची मागणी मोठ्या प्रमाणात असते. असे असताना केवळ विजेच्या लपंडावामुळे शहरातील नागरिकांना दहा ते बारा दिवसाला पाणी मिळत आहे.
-----
आम्ही वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना वारंवार सांगूनही त्यांना बिघाड सापडत नाही. यामुळे शहरातील नागरिकांना पाणी उशिरा व कमी वेळ मिळू लागले आहे. लवकरात लवकर बिघाड दुरुस्त करून पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येईल.
-शेख मंजूर, नगराध्यक्ष, माजलगाव नगरपरिषद.