बीड - शिवसेनेच्या माजलगाव तालुकाप्रमुखाने शिवसेना प्रवेशाच्या नावाखाली बनावट व कुठलेही राजकीय अस्तित्व नसणा-यांना मोठे पदाधिकारी दाखवून शिवसेना प्रवेश घडवून आणले . ही तर थेट पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचीच दिशाभूल करण्याचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे. प्रवेशाचे व्हिडीओ क्लिप सध्या सोशल मिडीयावर व्हायरल झाली असून चर्चेला उत आला आहे. तालुकाप्रमाखांनी आपल्या चुकीची कबुलीही दिली आहे.
तालुक्यातून शिवसेनेचे प्राबल्य म्हणावे तितके राहिलेले नाही, शिवसेनेचाही एक काळ होता, असे म्हणण्याइथपर्यंत गंभीर अवस्था शिवसेनेची झालेली आहे. त्यातच तालुक्यातील शिवसेनेचा तालुका शिलेदार असणा-या तडजोडी व्यक्तिमत्वाने थेट पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यासोबत बनवाबनवी केल्याचा प्रकार उघड झाला आहे. ज्यांचे माजलगाव तालुक्यात कसल्याही प्रकारचे राजकीय अस्तित्व नाही अशांना उध्दव ठाकरे यांच्यासमोर वेगवेगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी असल्याचे दाखवून मोठे प्रवेश शिवसेनेत करुन घेतल्याचा बनाव केल्याने येथील शिवसेना तालुकाप्रमुखाचे पितळ चांगलेच उघडे पडले आहे.
येथील बाजार समिती, नगर परिषद, पंचायत समितीमध्ये कसल्याही प्रकारचे सदस्य किंवा पदाधिकारी नसलेल्यांना उध्दव ठाकरे यांच्यासमोर पदाधिकारी म्हणून नेऊन प्रवेश घडवून आणला तर हनुमंत शिंदे या व्यक्तीला तर थेट बाजार समितीचा सभापती म्हणून दाखवले. नगरसेवक म्हणून दासू पाटील बादाडे तर पंचायत समिती सदस्य म्हणून रमेश उध्दव शिंदे यांना समोर करुन मोठी कामगिरी केल्याचा आव आणून आपल्याच पायावर धोंडा पाडून घेतला. आपल्या वरिष्ठांना खुश करण्यासाठी व आपले पद टिकावे म्हणून हा सर्व प्रताप शिवसेना तालुकाप्रमुखाने केला असल्याचे दिसून येते तर यापूर्वी देखील, असे अनेक प्रकार या तालुकाप्रमुखाने केल्याचा आरोप खुद्द पदाधिकारी, कार्यकर्तेच करू लागले आहेत.
व्हिडीओ व्हायरल
या सर्वांच्या पक्ष प्रवेशाचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. या कार्यक्रमासाठी खुद्द जिल्हाप्रमुख अनिल जगतापही उपस्थित असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. त्यामुळे हा सर्व प्रकार कोणाच्या सांगण्यावरून तर झाला नाही ना, असा सवाल उपस्थित झाला असून तशी चर्चेला उत आला आहे.
चूक लक्षात आली आहे
आम्ही प्रवेश केलेल्यांना ते पदाधिकारी असल्याचे दाखविले. मात्र नंतर आमच्या ही चूक लक्षात आली आहे. यापुढे असा प्रकार होणार नाही याची आम्ही काळजी घेवू.
- सतीश सोळंके, शिवसेना तालुकाप्रमुख, माजलगाव