माजलगाव : येथील माजलगाव धरणाची पाणीपातळी चांगलीच खालावली असून, बुधवारी ही पाणीपातळी ४५ टक्यांपर्यत खालावली आहे. सध्या कडक उन्हाळा जाणवू लागला असून, धरणातून पिकांसाठी मोठ्या प्रमाणात पाणी उपसा चालू आहे. तर कालव्याद्वारे आणखी पाणीपाळ्या शेतकऱ्यांसाठी देण्यात येणार आहे. त्यामुळे पावसाळा सुरू होईपर्यंत धरणाची पाणीपातळी चांगलीच खालावणार असल्याने बीड, माजलगावसह अनेक गावच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.
मागीलवर्षी परतीच्या पावसाने चांगलीच हजेरी लावून सप्टेंबर महिन्यात हे धरण पूर्ण क्षमतेने भरले होते. धरण परिसरात सप्टेंबरनंतरही पाऊस पडत राहिल्याने या धरणातून दीड ते दोन महिने पाणी सिंदफणा नदी पात्रात सोडण्यात आले होते. यामुळे शेतकऱ्यांना आनंद निर्माण झाला होता व मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी उसाची लागवड केली होती.
माजलगाव धरणावरील भागात शेतकऱ्यांकडून पिकांसाठी मोठ्या प्रमाणावर पाणी उपसा सुरू आहे, तर सध्या कडक उन्हाळा सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याचे बाष्पिभवन होताना दिसत आहे. त्याचबरोबर धरणाखालील भागात असलेल्या शेतकऱ्यांसाठी कालवा व चारीद्वारे आतापर्यंत चार पाणीपाळ्या सोडण्यात आल्या असून, पाचवी पाणीपाळी सध्या सुरू आहे. तर मे व जून महिन्यात शेतकऱ्यांसाठी आणखी तीन पाणीपाळ्या देण्यात येणार असल्याची माहिती धरणाची अभियंता बी. आर .शेख यांनी दिली.
माजलगाव धरण हे ४३१.८० मीटर पाणीपातळी झाल्यास पूर्ण क्षमतेने भरते. या धरणाची पाणीपातळी २.५६ मीटरने कमी होऊन बुधवारी दुपारी दोन वाजता एकूण पाणीसाठा ४२९.२४० मीटरएवढा झाला होता.
उपयुक्त पाणीसाठा हा २८१.४० दलघमी एवढा झाला, तर धरणाच्या पाण्याची टक्केवारी ही ४४.६८ टक्के झाल्याची माहिती बी. आर. शेख यांनी दिली.
या धरणाची पाणीपातळी मोठया प्रमाणात खालावली असून, एप्रिलचा निम्मा व मे महिना पूर्ण जाणार असून, जूनमध्ये वेळेवर पाऊस न पडल्यास बीड व माजलगाव शहरासह १५-२० गावांचा पिण्याच्या पाण्याबरोबरच सिंचनाचा प्रश्न गंभीर होऊ शकतो.
===Photopath===
140421\img_20210403_104828_14.jpg