माजलगाव : विद्यार्थ्यांनो आधी शिक्षण पूर्ण करून आपले भविष्य घडवा, मगच राजकारण करा. भवितव्याचा विचार करून आपली दिशा ठरवून भविष्य उज्ज्वल करावे, असे मत आ. रोहित पवार यांनी व्यक्त केले.
येथील सुंदरराव सोळंके महाविद्यालयात आयोजित ‘संवाद तरुणाईशी’ या कार्यक्रमात आ. रोहित पवार बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आ. प्रकाश सोळंके, प्राचार्य व्ही.पी. पवार, जि.प. सदस्य जयसिंग सोळंके, भानुदास डक यांची उपस्थिती होती.
यावेळी आ. पवार म्हणाले, राजकारणी लोक हे आपल्या स्वार्थासाठी तरुणांचा वापर करून घेतात. तेव्हा तरुणांनी आपली दिशा कोणती, आपण काय केले पाहिजे, याचा विचार करावा. त्यानुसार आपले भविष्य घडविले पाहिजे, शिक्षण घेऊन रोजगारनिर्मिती केली पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी प्रश्न ऐकून घेत उपस्थित विद्यार्थ्यांना दिलखुलास उत्तरे दिली. विद्यार्थ्यांनीदेखील अत्यंत चातुर्याने आपले प्रश्न विचारून सामाजिक, शैक्षणिक बाबींवर त्यांचे लक्ष केंद्रित केले. यावेळी आ. पवार म्हणाले, अनुभवी व्यावसायिकांशी चर्चा करा. ते ज्या पद्धतीने व्यवसाय चालवीत आहेत, त्यानुसार तुम्ही काम करा, प्रत्येक क्षेत्रात करिअर करता येते. त्यासाठी मात्र मेहनतीची आवश्यकता असते. युवकांनी चौफेर लक्ष ठेवून परिसरात घडणाऱ्या गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे.
प्रास्ताविक आ. सोळंके यांनी केले. जयसिंह सोळंके यांनी आभार मानले.
समाजसेवेसाठी राजकारणात
एका विद्यार्थ्याने आ. रोहित पवार यांना आपण राजकारणात का आलात, असा प्रश्न विचारला असता आपण समाजासाठी काही तरी केले पाहिजे, आपले सामाजिक देणं म्हणून काही तरी करायचे आहे, सर्वसामान्य नागरिकांना न्याय द्यायचा आहे, समाजाच्या सेवेचे माध्यम म्हणून मी राजकारणात प्रवेश केल्याचे उत्तर देत त्यांनी उपस्थितांची मने जिंकली.