बीड: जिल्ह्यात सायबर गुन्हेगारांचा उपद्रव सुरूच आहे. २४ तासांत आणखी दोन घटना समोर आल्या. निवृत्त प्राचार्य व एका विद्यार्थिनीला केवायसीच्या नावाखाली ऑनलाइन गंडा घालण्यात आला.
डॉ. अरुण नीळकंठ भस्मे (रा. चाणक्यपुरी, बीड) हे निवृत्त प्राचार्य आहेत. अनोळखी व्यक्तीने १५ जुलै रोजी त्यांना मोबाइलवर संपर्क करून ऑनलाइन केवायसी करा, असे सांगितले. नंतर त्यांच्या खात्याविषयी माहिती जाणून खात्यातून ६० हजारांची रक्कम लंपास केली. बँकेत चौकशी केल्यानंतर फसवणूक झाल्याचे समोर आले. अरुण भस्मे यांनी शिवाजीनगर ठाण्यात २८ ऑगस्ट रोजी फिर्याद दिली. त्यावरून मोबाइलवरून संवाद साधणाऱ्या अनोळखीविरुद्ध फसवणूक व माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलमानुसार गुन्हा नोंद झाला.
दुसऱ्या घटनेत ऐश्वर्या अजिनाथ हाडुळे (रा. स्वराज्यनगर, बीड) या विद्यार्थिनीला २३ जुलै रोजी अनोळखी व्यक्तीने संपर्क केला. ‘केवायसी ऑनलाइन करा,’ असे सांगत तिच्या खात्याविषयी गोपनीय माहिती जाणून घेतली. त्यानंतर २० हजारांची रक्कम लांबवली. या प्रकरणातही २८ ऑगस्ट रोजी शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा नोंद झाला. दोन्ही प्रकरणांचा तपास पोलीस निरीक्षक साईनाथ ठोंबरे करत आहेत.
फसव्या कॉलपासून सावध राहावेकोणतीही बँक कधीही कॉल करून ग्राहकाला खात्याविषयी माहिती विचारत नाही किंवा एटीएम अथवा कोणती लिंक पाठवून केवायएसी प्रक्रिया ऑनलाइन करण्याचे सांगत नाही. त्यामुळे नागरिकांनी अशा फसव्या कॉलवरून संपर्क साधणाऱ्यांपासून वेळीच सावध राहून आपली बँक खातेविषयक गोपनीय माहिती कोणालाही देऊ नका, असे आवाहन पोलीस निरीक्षक साईनाथ ठोंबरे यांनी केले आहे.