गेवराई : परिवर्तन हा शिक्षण व्यवस्थेला लागू पडणारा घटक असून बदलत्या काळात माहिती तंत्रज्ञानाच्या आधारे अध्यापन, अध्ययन प्रभावी करावे लागणार असल्याचे मत विविध तज्ज्ञांनी कार्यशाळेत मांडले. र. भ. अट्टल महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ वर्धापन दिनानिमित्त एक दिवसीय ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन केले होते.
'माहिती तंत्रज्ञानाचा अध्ययन अध्यापनासाठी उपयोग' या विषयावर परळीच्या लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख, डॉ. राजकुमार यल्लावाड, माजलगाव येथील सुंदरराव सोळंके महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. एम. ए. कव्हळे यांनी मार्गदर्शन केले.
बदलत्या काळातील शिक्षण व्यवस्थेत झालेले बदल आणि अध्ययन अध्यापनाच्या बदलत्या पद्धती, त्यासाठी उपयुक्त साधने, इंटरनेट व माहिती तंत्रज्ञान, सोशल मीडिया, फेसबुक, यू ट्यूब इत्यादी समाज माध्यमांचा वापर कसा करता येईल. केवळ पाठ्यपुस्तक व अभ्यासक्रमावर अध्ययन आणि अध्यापन प्रक्रियेवर अवलंबून न राहता, ती माहिती तंत्रज्ञानाच्या पद्धतीने व वेगवेगळ्या साधनांनी अधिक प्रभावी कशी करता येऊ शकते यावर तज्ज्ञांनी मते मांडली. सद्यस्थितीत देशातील विद्यापीठे व महाविद्यालयातील अध्यापक, प्राध्यापक या आधुनिक साधनांचा वापर कुशलतेने कसा करताना दिसतात हे कार्यशाळेतून अधोरेखित झाले. या कार्यशाळेत राज्यातील विविध महाविद्यालयाचे प्राध्यापक, विद्यार्थी, अभ्यासकांनी सहभाग नोंदविला. कार्यशाळेला प्राचार्य डॉ. रजनी शिखरे यांची विशेष उपस्थिती होती. प्रारंभी मराठी विभाग प्रमुख डॉ. संदीप बनसोडे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन डॉ. समाधान इंगळे यांनी केले. या कार्यशाळेत विजय सांगळे, डॉ. प्रशांत पांगरीकर, डॉ. प्रवीण सोनुने, डॉ. बालाजी रुपनर, क्रीडा विभाग प्रमुख डॉ. सचिन पगारे, कार्यालयीन अधीक्षक भागवत गवंडी, प्रबंधक बप्पासाहेब पिंपळे, प्रा. रेवणनाथ काळे, प्रा. बाळासाहेब जोगदंड, प्रा. अरुण जाधव, डॉ. सतीश जाधव, प्रा. संतोष नागरे, डॉ. सुनील भगत, प्रा. अमोल सिरसाट, प्रा. चंद्रकांत पुरी, प्रा. हर्षवर्धन इंगळे यांची उपस्थिती होती.