परळी - आष्टी आदी ठिकाणी सिटीस्कॅन यंत्रणेची उपलब्धता, आष्टीसह ग्रामीण रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन निर्मितीची व्यवस्था, शिरूर येथे सामाजिक समाज कल्याण हॉस्टेलमध्ये असलेल्या रुग्णालयात १०० ऑक्सिजन बेडची व्यवस्था करण्यासाठी प्रस्ताव करणे आणि तातडीने मंजुरी देणेबाबत संबंधित अधिकाऱ्यांना पालकमंत्री मुंडे यांनी निर्देश दिले.
जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी सांगितले की, जिल्ह्यात सध्या जिल्हा रुग्णालय स्वाराती वैद्यकीय महाविद्यालय आणि लोखंडी सावरगाव येथील महिला रुग्णालय येथे ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प कार्यान्वित आहेत. जिल्ह्याची ऑक्सिजन निर्मिती क्षमता वाढविण्यासाठी उपजिल्हा रुग्णालय ग्रामीण रुग्णालय यासह कोविड रुग्णालयांमध्ये आणखी ऑक्सिजन निर्मिती क्षमता प्रस्तावित करण्यात आली असून, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी जिल्हा यंत्रणांना सुसज्ज केले जात आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी कुंभार म्हणाले, आरोग्य यंत्रणा सुसज्ज करताना पेडियाट्रिक डॉक्टर्सची आवश्यकता असल्याने इतर डॉक्टर्सना प्रशिक्षण देऊन तयार केले आहे. जिल्हा रुग्णालय आणि स्वाराती वैद्यकीय महाविद्यालय येथे १०० बेडचे पेडियाट्रिक आयसीयू सज्ज ठेवण्यात आले आहे. यासह ५६० आयसीयू बेड विविध शासकीय रुग्णालयांत सुसज्ज आहेत.
आमदार संदीप क्षीरसागर यांनी जिल्हा रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्यास आरोग्य व सुरक्षा यंत्रणेवर ताण येतो याचा विचार करून पुढील काळात जवळ असलेल्या चौसाळा, राजुरी, चऱ्हाठा येथे कोरोना उपचारांसाठी ऑक्सिजन बेड असलेले कोविड सेंटर सुसज्ज केले जावे. जिल्हा रुग्णालयातील सिंगल स्लाईस सिटीस्कॅन यंत्रणाचे रूपांतर अत्याधुनिक केले जावे. ऑक्सिजन निर्मिती क्षमता वाढविण्यात यावी यासाठी तसेच सिटीस्कॅन मशीन खरेदीसाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुंडेंनी दिले.
आ. बाळासाहेब आजबे यांनी शिरूर येथे ऑक्सिजन बेडची आवश्यकता असून, आष्टी येथे ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प तातडीने व्हावा आणि व्हेंटिलेटरची उपलब्धता व्हावी, असे सांगितले.
या वेळी निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी प्रास्ताविक केले. तसेच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश साबळे, स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार यांनी माहिती सादर केली. बैठकीमध्ये जिल्हा परिषदेचे सभापती कल्याण आबुज तसेच शिवाजी शिरसाट उपस्थित होते.
बीड जिल्ह्यातील जवळपास सात लाख नागरिकांचे लसीकरण करण्यात आले असून, यापैकी दुसरा डोस दिलेल्या पूर्ण लसीकरण झालेल्या नागरिकांची संख्या १ लाख ६३ हजार आहे. आज जिल्ह्यात २६३, व्हेंटिलेटर, २०८ बायोपॅप मशीन आणि १०२० कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध आहेत. तसेच संभाव्य लाटेच्या दृष्टीने लहान मुलांसाठी एनआयसीयूसह आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करण्याबाबत मुंडेंनी संबंधितांना सूचना केल्या.