- नितीन कांबळे कडा - बसची वाट पाहत थांबलेल्या महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी ओरबाडून नेल्याची घटना १८ रोजी घडली होती. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने खबऱ्याने दिलेल्या माहितीवरून दोघांच्या माळशेज घाटात एका बंद पडलेल्या हॉटेलमधून बुधवारी रात्री मुसक्या आवळल्या. दोन्ही आरोपींना आष्टी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. अल्पवधीत आरोपी ताब्यात घेऊन उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल स्थानिक गुन्हे शाखेचे कौतुक केले जात आहे.
आष्टी तालुक्यातील मुर्शदपूर येथील विजया विश्वनाथ शिंदे या १८ मे रोजी पुण्याला जाण्यासाठी दुपारच्या दरम्यान आष्टी बसस्थानकात आल्या होत्या. बसची वाट पाहत असताना यांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण बळजबरीने हिसकावून चोरून नेल्याचा प्रकार घडला होता. अज्ञात चोरटय़ांविरुद्ध १९ रोजी आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखेच्या बीडच्या पथकाने घटनास्थळाला भेट देऊन याची माहिती घेतली.
दरम्यान, पथकाने रविवार पासून तपासाला सुरुवात केली. त्यानंतर खबऱ्याच्या माहितीवरून पथकाने बुधवारी रात्री माळशेज घाटातील एका बंद पडलेल्या गणेश दिनकर झिंजुर्डे व किशोर भाऊसाहेब शेळके ( दोघे रा. पाथर्डी जि.अहमदनगर ) यांना ताब्यात घेतले. पोलीसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्हाची कबुली दिली. स्थानिक गुन्हे शाखेने दोघांना आष्टी पोलीसांच्या ताब्यात दिले असून पुढील तपास सुरु आहे.
ही कामगिरी पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकुर, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर याच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश वाघ, पोलीस उपनिरीक्षक पोलीस भगतसिंग दुल्लत,हेडकॉन्स्टेबल मनोज वाघ ,पोलीस नाईक सोमनाथ गायकवाड, विकास वाघमारे ,सलीम शेख, अशोक सुरवसे ,अशोक कदम यांनी केली.