बीड : उन्हाळ्यात आंब्याची मजा काही औरच. बीड शहरात लालबाग, बदाम, हापूस आणि केशर जातीच्या आंब्याची आवक वाढली आहे. आंध्र प्रदेश व कर्नाटकातून आलेला आंबा साधारणत: १०० ते १२५ रुपये प्रतिकिलो दराने विकला जात आहे. लॉकडाऊन सवलतीच्या कालावधीत आंबे खरेदीसाठी ग्राहक बाजारात चौकशी व खरेदी करतात.
कागदी ग्लास वापरण्याकडे दुर्लक्ष
बीड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षितता बाळगण्यासाठी टपरीचालकांनी ग्राहकांना कागदी ग्लासात चहा देण्याची गरज आहे. मात्र अनेक विक्रेते काचेच्या ग्लासात चहा देत आहेत. यामुळे संसर्ग उद्भवू शकतो. यासाठी कागदी ग्लासचा वापर प्राधान्याने करावा, अशी मागणी चहाप्रेमींमधून आहे.
विद्युत रोहित्रांना संरक्षण कवाडे नाहीत
पाटोदा : तालुक्यात ग्रामीण भागात अनेक विद्युत रोहित्रांचे बॉक्स उघडे आहेत. संरक्षण कठड्यांचा अभाव असल्याने संबंधितांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. परिसरातील विद्युत रोहित्रांमध्ये बिघाड होतो. फ्युज, तार व बॉक्स उघडेच असतात. त्यामुळे अपघाताचा धोका संभवतो.
पांदण रस्त्याच्या दुरवस्थेमुळे त्रास
बीड : तालुक्यातील पिंपळनेर, केसापुरी परभणी व लगतच्या गावांतील पांदण रस्त्याची दुरवस्था झाली आहे. वेळोवेळी मागणी करूनदेखील रस्त्याची दुरुस्ती करण्यात येत नाही. त्यामुळे शेतात येताना - जाताना नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. तसेच शेतमाल नेतानादेखील अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.