- अविनाश मुडेगावकर
अंबाजोगाई-: बीडसह उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यातील बहुतांशी भागाचा प्रमुख जलस्त्रोत असणारा मांजरा प्रकल्प आज रविवारी (दि.१६ ) सकाळी तुडुंब भरला. त्यामुळे धरणाच्या उजव्या कालव्यातून १४.९७ क्यूसेक (०.४२४ क्यूमेक्स) वेगाने विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला. त्यानंतर सकाळी 8:00 ते 9:00 वाजे दरम्यान मांजरा प्रकल्पाचे द्वार क्र. 1 आणि 6 असे एकुण 2 द्वार 25 सेंटिमीटर उंचीवर उघडून मांजरा नदीपात्रात 1747.33 क्युसेक (49.48 क्युमेक्स) इतका विसर्ग सोडण्यात आला आहे.
धनेगाव येथील मांजरा नदीवर सिंचनाच्या उद्देशाने बांधण्यात आलेल्या मांजरा धरणाची साठवण क्षमता एकूण २२४.०९३ दशलक्ष घनमीटर एवढी आहे तर उपयुक्त पाणीसाठा १७६.९६३ दशलक्ष घनमीटर आहे. मांजरा धरणाची एकूण पाणी पातळी ६४२.३७ मीटर आहे.
मागील आठवड्यात मांजरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसाने धरणाच्या वरच्या बाजूस असलेले २६ लहान-मोठे तलाव व १४ बंधारे पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर मांजरा धरणातही पाण्याची आवक वेगाने सुरू झाली होती. शुक्रवारी रात्री धरण भरणार असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता, मात्र नंतर पाण्याची आवक मंदावली. अखेर आज रविवारी सकाळी ६ वाजता मांजरा धरण १०० टक्के पूर्ण भरले. पाण्याची आवक कमी असल्याने धरणाचे दरवाजे उघडण्याऐवजी सकाळी आठ वाजतापासून धरणाच्या उजव्या कालव्यात १४.९७ क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. परंतु त्यांनतर सकाळी 8:00 ते 9:00 वाजे दरम्यान मांजरा प्रकल्पाचे द्वार क्र. 1 आणि 6 असे एकुण 2 द्वार 25 सेंटिमीटर उंचीवर उघडून मांजरा नदीपात्रात 1747.33 क्युसेक (49.48 क्युमेक्स) ईतका विसर्ग सोडण्यात आला आहे.
सतर्कतेचा इशारादरम्यान, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून आपत्कालीन परिस्थितीत तालुका प्रशासनाशी संपर्क साधावा असे आवाहन पुर नियंत्रण कक्ष, मांजरा धरण यांच्या वतीने सांगण्यात आले आहे.