- दीपक नाईकवाडे
केज (बीड ) : पावसाने पाठ फिरवल्याने धनेगाव येथील मांजरा धरणात दोन महिने पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. या धरणातून लातुर शहरासह बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई, केज ,धारुर व उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंबला पाणीपुरवठा करण्यात येतो. यामुळे येणाऱ्या काळात पाऊस पडला नाही तर या शहरांवर पाणी टंचाईचे संकट येऊ शकते. सद्यस्थितीत मांजरात 6.576 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उपलब्ध आहे.
पावसाळा चालु होऊन दोन महिन्याचा कालावधी लोटला तरी मांजरा धरण परिसरात समाधानकारक पाऊस झाला नाही. परिणामी धरणात पावसाळ्यात पाणी वाढण्या ऐवजी दररोज घट होत आहे. धरणातुन लातुर शहर व लातुर एमआयडीसीसह बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई , केज, धारुर , उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील जवळपास 14 गावापेक्षा अधिक गांवाना पाणी पुरवठा करण्यात येतो. धरणात पिण्याच्या पाण्यासाठी आजमितीस 6.576 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उपलब्ध आहे. पाणीसाठ्यातुन दररोज 0.007 दशलक्ष घनमीटर पाण्याचे बाष्पीभवन होते. पाणीपुरवठा योजनेतून दररोज 0.04 दशलक्ष घनमीटर पाण्याचा उपसा केला जातो अशी माहिती सहायक अभियंता शहाजी पाटील यांनी दिली.