अंबाजोगाई (बीड) : मांजरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे मांजरा धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरू असून, धरणातील पाणीसाठा जवळपास ९४ टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे पावसाची सद्यस्थिती पाहता आता कोणत्याही क्षणी मांजरा धरणातून पाण्याचा विसर्ग केला जाऊ शकतो. त्यामुळे मांजरा नदीकाठच्या ग्रामस्थांना पाटबंधारे विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. ग्रामस्थांनी सुरक्षितस्थळी जावे. तसेच जनावरांनाही सुरक्षित ठिकाणी हलवावे, असे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे.
गेल्या दोन ते चार दिवसांपासून मांजरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात परतीच्या पावसाने जोर धरला आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा वेगाने वाढला असून, आता हे धरण भरत आले आहे. मांजरा धरण गेल्यावर्षीही तुडुंब भरले होते. त्यामुळे यंदा धरणातील पाणीसाठा ५० टक्क्यांच्या जवळपास होता. त्यातच राज्यातील धरणे अगोदरच तुडुंब भरलेली असताना मांजरा पाणलोट क्षेत्रात मोठा पाऊसच झाला नव्हता. त्यामुळे मांजरा धरणातील पाणीसाठा जैसे थे होता. मात्र, मागच्या आठवड्यात आणि गेल्या ४ दिवसांपासून पाऊस सुरू असल्याने धरण जवळपास भरत आले आहे.
अंबाजोगाई, केज,धारूर,लातूर शहरासह उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यांतील अनेक गावांची तहान भागविणा-या मांजरा धरणात सद्यस्थितीत ९४ टक्के पाणीसाठा झाला आहे. धरण भागात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. परिणामी धरण केव्हाही भरू शकते. त्यामुळे आता धरणातून कोणत्याही क्षणाला पाण्याचा विसर्ग केला जाऊ शकतो. त्यामुळे मांजरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
या धरण क्षेत्रात झालेल्या पावसामुळे धरण भरण्याच्या स्थितीत आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. तसेच या पाण्यामुळे यंदा मांजरा पट्टा हिरवा राहण्यास मदत होणार आहे. विशेष म्हणजे सलग तीन वर्षे हे धरण भरत आलेले आहे. मात्र, यावेळी पावसाळा संपत आला, तरी धरणाची पाणीपातळी जैसे थे होती. उलट पाणीसाठा कमी होत चालला होता. मात्र, नेहमीप्रमाणे परतीच्या पावसाने तारले आणि धरण क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने हे धरण भरत आले आहे.