केज ( बीड ), दि 22 : मागील आठवड्यात दमदार पाऊस झाल्याने मांजरा धरण शुक्रवारी पहाटे 6 वाजता 99.47 टक्के पर्यंत भरले. धरणात येणारी आवक व क्षेत्रात यानंतरही पावसाचा अंदाज असल्याने धरणाचे ६ दरवाजे तात्काळ 00.25 मी (25 मिमी ) ने उघडण्यात आले. या विसर्गाने धरणाखालील नदी पात्रात पूर सदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे.
लातुर ,उस्मानाबाद आणि बीड या तीन जिल्ह्यातील 40 गावे अवलंबून असलेल्या मांजरा धरणाची पाणी पातळीची क्षमता 642.37 मीटर एवढी आहे. शुक्रवारी पहाटे 6 वाजता धरणाची पाणी पातळी 642.35 मीटर झाली. यानुसार धरण जवळपास 99.47 टक्के भरले. या सोबतच धरणात येणारी आवक व येणा-या काळातील पावसाचा अंदाज लक्षात घेऊन प्रशासनाने धरणाचे सहा दरवाजे 00.25 मीटरने ( 25 मिमी ) ने उघडण्याचा निर्णय घेतला.
सध्या या धरणातील एकुण पाणी साठा 223.157 दलघमी एवढा असून धरणात येणा-या पाण्याचा आेघ 11.973 दलघमी /प्रतिसेकंद असा आहे .तर सहा दरवाजे उघडल्यामुळे धरणातुन 148.20 घनमिटर/प्रतिसेकंद या वेगाने पाण्याचा विसर्ग मांजराच्या नदीपात्रात सुरू आहे. त्यामुळे धरणा खालील नदीच्या काठावरील गावांत पूर सदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या वर्षीही 26 सप्टेंबर रोजी या धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आले होते. 1985 पासुन 14 वेळेस या धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत
82 गावांना सावधानतेचा इशाराकर्नाटक राज्याच्या सिमेपर्यंतच्या नदीकाठच्या सौंदना ,आवाड शिरपूरा ,नायगाव ,इस्थळ , वाकडी ,आपेगाव ,पाटोदा (ममदापुर ) धानोरा ,तांदुळजा सह एकूण 82 गावातील नागरीकांना सतर्कतेचा ईशारा देण्यात आला असल्याची माहिती शाखा अभियंता शाहुराज पाटील यांनी लोकमतशी बोलताना दिली
पोलिस बंदोबस्त वाढविलामांजरा धरण हे बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्याच्या सिमेवर आहे. यामुळे बीड व उस्मानाबाद पोलिस मुख्यालयाकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे अशी माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल देशपांडे यांनी दिली.